शाश्वत विकासासाठी आदिवासींच्या क्षमता अभ्यासा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग ’ या विषयावरील कुलगुरू संमेलन
नागपूर, दि.24 : आदिवासी घटकांमधे खुप क्षमता आहेत त्यांचा वापर करून शाश्वत विकास साधण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे कुलगुरूंना दिल्या. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरूंच्या संमेलनात राज्यपाल बोलत होते. उपस्थित महाराष्ट्र व छत्तीसगड मधील कुलगरूंना राज्यपाल म्हणाले की, आपण या ठिकाणी आदिवासींसाठी विचारमंथन करत आहात, ही आनंदाची बाब आहे. तुम्ही देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या ज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासात योगदान द्यावे. आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण योगदान देत असताना, आदिवासींची संस्कृती, परंपरा जपत त्यांना नव्या प्रवाहात येण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या कामांची प्रशंसा केली. आदिवासी आणि शिक्षणाचे महत्व सांगितले. व्यासपीठावर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डॉ.गजानन डांगे उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिवसभरातील विचारमंथनातून तयार केलेल्या श्वेतपत्रिकेचे अनावरण केले.
श्वेतपत्रिकेबाबत कुलगुरू बोकारे यांनी माहिती सादर केली. ते म्हणाले, आदिवासींचे हक्क आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी त्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या अर्थचक्रासाठी परंपरागत वनोपज गोळा करणे, प्रकिया करणे, उद्योग उभारणी करणे, तेथील झाडीपट्टी नाट्य व्यवसायाची नोंद घेणे. त्यांना आवश्यक ज्ञान देण्याची व प्रत्यक्ष माहिती गोळा करून संशोधन अहवाल व अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. या श्वेतपत्रिकेत शाश्वत विकासासाठी अनेक मुद्दयांचा समावेश करण्यात आला आहे. या संमेलनात पुणे मुंबईसह मराठवाडा, नाशिक तसेच बिलासपूर येथील विद्यापीठ कुलगुरू व प्राध्यापकांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक डॉ.गजानन डांगे यांनी केले. संचलन डॉ.श्याम कोरेटी यांनी तर आभार प्रदर्शन प्र-कुलगरू डॉ.संजय दुधे यांनी केले.