पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत मनपाच्या १२ शाळांची निवड
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत बनणार आदर्श शाळा
चंद्रपूर २१ डिसेंबर – केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत शासकीय शाळांमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा, आनंददायी व उत्साहवर्धक वातावरण, गुणात्मक शिक्षण देण्यासाठी पीएम श्री शाळा योजना (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ) राबविली जात आहे. याकरीता शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सरकारी शाळांची निवड करण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेच्या १२ शाळांची निवड पीएम श्री शाळा योजनेत करण्यात आली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका संचालित पं. दीनदयाळ उपाध्याय शाळा, स्वामी विवेकानंद प्रा. शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रा. शाळा,कर्मवीर कन्नमवार प्रा. शाळा ,लालपेठ तेलगु अपर प्रा. शाळा, लोकमान्य टिळक मुलींची प्रा. शाळा, लोकमान्य टिळक प्रा. शाळा, महाकाली कॉलरी प्रा. शाळा, महात्मा ज्योतिबा फुले प्रा. शाळा,रयतवारी कॉलरी प्रा. शाळा,सावित्रीबाई फुले अपर प्रा. शाळा, शहीद भागात सिंग प्रा. शाळा या १२ शाळांची निवड झाली आहे.
पीएम श्री योजनेचे मुख्य उद्दिष्ट भारतातील जुन्या शासकीय शाळांना बळकट करून आधुनिक करणे हे आहे. जेणेकरून या शाळांची पुनर्रचना करून मुलांना स्मार्ट शिक्षणाशी जोडता येईल.या योजनेंतर्गत श्रेणीसुधारित केलेल्या पीएम श्री शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सर्व घटकांची समावेश असेल. पीएम श्री योजनेच्या माध्यमातून आता गरीब मुलेही स्मार्ट स्कूलमध्ये सहभागी होऊ शकतील, ज्यामुळे भारताच्या शिक्षण क्षेत्राला एक वेगळी ओळख मिळेल
भावी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक मजबूत करण्यासाठी पीएम श्री योजनेंतर्गत अद्ययावत पीएम श्री शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा असतील. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण असेल. या शाळा त्यांच्या आसपासच्या इतर शाळांनाही मार्गदर्शन करतील.याशिवाय यामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकता येईल तसेच सरावही होईल.
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या मुलांसाठी खेळावर भर दिला जाणार आहे. जेणेकरून त्यांचा शारीरिक विकास होऊ शकेल. ही योजना शाळांना आधुनिक गरजांनुसार अपग्रेड करेल. ज्याद्वारे मुलांच्या आधुनिक गरजा पूर्ण होतील आणि ते चांगल्या वातावरणात शिक्षण घेऊ शकतील.
या शाळांना हरित शाळा म्हणून विकसित केले जाणार असुन प्रत्येक इयत्तेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिकण्यातून काय निष्पन्न झाले यावर भर दिला जाईल. वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाच्या वापरावर आणि योग्यतेवर सर्व स्तरांवरील मूल्यमापन आधारित असेल. शाळा गुणवत्ता मूल्यांकन रचना(SQAF) विकसित केली जात आहे. शिक्षण प्रणाली किती परिणामकारक आहे याचे आकलन करण्यास ही रचना प्रमुख निर्देशक आहे. इच्छित मानकांची खात्री करण्यासाठी नियमित अंतराने या शाळांचे गुणवत्ता मूल्यमापन केले जाईल. मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून या शाळा विकसित केल्या जाणार आहेत.