शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक शेततळे योजना 75 हजार रूपये कमाल अनुदान

शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक शेततळे योजना 75 हजार रूपये कमाल अनुदान

· लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

 

भंडारा, दि. 20 : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी वैयक्तिक शेततळे योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता कमाल 75 हजार रूपये अनुदान देय असून योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी महाडीबीडी प्रणालीवर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक अर्चना कडू यांनी केले आहे.

 

योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्याकडे स्वत: च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही, जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील. संबंधीत शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे, भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतुन शेततळे योजनकरिता लाभ घेतलेला नसावा.

 

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल, संगणक, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यासरख्या माध्यमाद्वारे https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर जावून शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज करावा. लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करून पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. अर्जदाराने प्रथम युझर आयडी व पासवर्ड तयार करून आपले खाते तयार केल्यानंतर वैयक्तिक शेततळे या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी व इच्छेनुसार पर्याय निवडावा. अधिक माहितीकरिता जवळील कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.