अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना Ø आतापर्यंत जिल्ह्यातील 70 युवकांना बँकेमार्फत 3,40,81,200 कर्ज मंजूर Ø बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना

Ø आतापर्यंत जिल्ह्यातील 70 युवकांना बँकेमार्फत 3,40,81,200 कर्ज मंजूर

 

Ø बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 19: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे, त्याकरिता विशेष करून मराठा व ज्या प्रवर्गाकरीता महामंडळ अस्तित्वात नाही अशा घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू करण्यात आले. त्यामार्फत स्वयंरोजगारास इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यात येते.

 

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे,योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

 

या आहेत तरुणांना व्यवसायासाठीच्या योजना:

 

1.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1):

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1) ही कोणत्याही बँकेमार्फत 15 लक्ष रुपयाच्या मर्यादेत असेल. तसेच कोणत्याही व्यवसायाकरीता, व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्ष, 12 टक्केच्या कर्ज मर्यादेत अथवा रु. 4.5 लाख रक्कमेच्या मर्यादेत करण्यात येईल.

 

2.गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2):

 

गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2)या योजनेतंर्गत किमान दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तीच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्ती कमाल 25 लाख, तीन व्यक्ती कमाल 35 लाख, चार व्यक्ती कमाल 45 लाख, तर पाच व्यक्ती किंवा पाचपेक्षा अधिक 50 लाखापर्यंत व्यवसाय कर्जावर व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्षाच्या मर्यादेत व 12 टक्केच्या कर्ज मर्यादेत करण्यात येईल.

 

आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 70 युवकांना बँकेमार्फत 3 कोटी 40 लक्ष 81 हजार 200 रु. कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 65 लाभार्थ्यांनी 35 लक्ष 61 हजार 136 रुपयाचा व्याज परतावा केला आहे. तर 313 अर्ज प्राप्त झाले आहे.

 

लाभार्थी पात्रता:

 

लाभार्थी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरिता व महिलांकरिता जास्तीत जास्त 60 वर्ष आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे. लाभार्थ्यांनी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करीत असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य आहे. एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

 

येथे करा अर्ज:

 

लाभार्थी www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात स्वतःचा अर्ज दाखल करू शकतात.

 

योजनांच्या अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, येथील कार्यालयात प्रत्यक्षपणे संपर्क साधावा. असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरीन पठाण यांनी केले आहे.