जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर कालावधीत सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती सप्ताह Ø शाळा व महाविद्यालयात होणार जनजागृती

जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर कालावधीत सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती सप्ताह

Ø शाळा व महाविद्यालयात होणार जनजागृती

चंद्रपूर, दि. 12: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व ‌ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यासह 21 जिल्ह्यांमध्ये सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबविण्यात येत आहे.

 

या सप्ताहानिमित्त आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. अनुवंशिक आजार असलेल्या सिकलसेल आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आदिवासी भागात आढळतात. या आजारावर अद्याप कोणताही कायमस्वरूपी उपचार नाही. या आजाराने बाधित रुग्ण व्यक्तींवर जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर मोफत औषधोपचार केले जातात. या आजाराचे संक्रमण पुढील पिढीत होऊ नये यासाठी सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

या उपक्रमामध्ये सिकलसेल आजाराची अचूक माहिती, आजाराची लक्षणे, प्रकार, औषधोपचार, आजार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्येक गावात वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत माहिती देणे, शाळा व महाविद्यालयात या आजाराबाबत जनजागृती करणे, प्रदर्शनी, चर्चासत्र, कार्यशाळा व चाचणी शिबिराचे आयोजन करणे. तसेच प्रसार माध्यमांतून सिकलसेल आजार जनजागृती, तपासणी व औषधोपचार बाबत माहिती प्रसारित करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत 20,97,571 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 2809 व्यक्ती सिकलसेल ग्रस्त तर 34,302 व्यक्ती वाहक शोधण्यात आले आहेत. तसेच एकूण 78 गर्भवती मातांचे परीक्षण करण्यात आले असून त्यापैकी 24 मातांचे बाळ सिकलसेल बाधित असल्यामुळे गर्भपात करण्यात आले आहे. 889 व्यक्तींना नियमित मोफत रक्त संक्रमण करण्यात येत असून 296 व्यक्तींना हायड्रॉक्सियुरिया औषधे देण्यात येत आहे. एकूण 145 सिकलसेल ग्रस्त व 2567 वाहक असे एकूण 2712 व्यक्तींचा समावेश प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तसेच सिकलसेल रुग्णांकरिता हिपरिप्लेसमेंटची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

सिकलसेल आजाराची तीव्रता:

 

सिकलसेल ग्रस्त रुग्णांना वारंवार रक्त संक्रमणाची गरज भासते. सिकलसेल वाहक स्त्री-पुरुषांचा आपसात विवाह झाल्यास त्यातून सिकलसेल ग्रस्त रुग्ण किंवा वाहक मुल जन्माला येण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी विवाहपूर्व सिकलसेल ची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच अंतिम निदानासाठी एचपीएलसी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर औषधोपचार व चाचणीची सोय उपलब्ध असून सर्व सिकलसेल आजार ग्रस्त रुग्णांना प्रामुख्याने फॉलिक ऍसिड, विटामिन सी तसेच ग्रामीण उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय स्तरावरून हायड्रॉक्सियुरिया अशी मोफत औषधे दिली जातात.

 

सिकलसेल ग्रस्तांना सुविधा:

 

या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सिकलसेल ग्रस्त रुग्णांना अनेक सुविधा देण्यात येतात. संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा मानधन, उपचारासाठी महिन्यातून दोन दिवस मोफत एसटी प्रवास, दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रति तास जादा 20 मिनिटे, मोफत रक्त संक्रमण कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र यु डी आय डी कार्ड, तसेच आवश्यकता असल्यास मोफत गर्भजल परीक्षण, एका मदतनिसासह मोफत बस प्रवास तसेच रेल्वे प्रवासात 50 टक्के सूट असा लाभ देण्यात येत आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.