महाविद्यालयांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 8 : आदिवासी विकास विभागामार्फत भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी या योजनेची शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षातील प्रकल्प अधिनस्त कार्यरत महाविद्यालयस्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे बरेचसे अर्ज प्रलंबित दिसून येत आहे. त्याअनुषंगाने महाविद्यालयांनी प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करावी व दि. 15 डिसेंबर 2022 पूर्वी प्रकल्प कार्यालयास सादर करावे.
याबाबत दिरंगाई झाल्यास लाभपात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाची सर्वस्वी जबाबदारी राहील, याची सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी व याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, असे चंद्रपूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.