नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी Ø केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र

नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Ø केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र

 

मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.

 

नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांताना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. तर हैद्राबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद या मार्गावर सध्या 22 रेल्वे गाड्या असल्या तरी 575 किमीचे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूर सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होईल. त्यामुळे या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीकरीता नागपूर ते हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.