वचितांना विकासाच्या प्रवाहात आणा – अमोल यावलीकर

वचितांना विकासाच्या प्रवाहात आणा – अमोल यावलीकर

Ø संविधान समता पर्वाचा समारोप

चंद्रपूर, दि. 6 : भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही तत्वे तसेच नागरीकांचे अधिकार व कर्तव्य या बाबीचा प्रचार-प्रसार करणे हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले.

 

समता पर्व – 2022 चा समारोप कार्यक्रम आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय परीसरातील सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. यावलीकर बोलत होते. कार्यक्रमाला जात पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शासकीय वसतीगृहाचे गृहपाल ए.डी.बोरकर, सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व 2 मिनिटांचे मौन पाळुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.

 

सहाय्यक आयुक्त यावलीकर म्हणाले, 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 पर्यंत समाजकल्याण विभाग, चंद्रपुर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बॉर्टी पुणेच्या समतादुत प्रकल्प चंद्रपुरचे सहकार्याने युवा गट कार्यशाळा, मागास वस्त्यातले स्वच्छता अभियान, तृत्तीयपंथीय व वृद्धांची कार्यशाळा व मार्गदर्शन, वसतीगृहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यांची माहिती दिली.

 

बॉर्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी दिली. समतादुत उपेंद्र वनकर यांनी श्रद्धांजलीपर गित गायले. वसतीगृहातील स्पर्धा मध्ये यशस्वी प्रथम, द्वितीय क्रमांकाच्या

 

विद्यार्थ्यांना पाहुण्याचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्याची यशोगाथा या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार संतोष सिडाम यांनी मानले. कार्यक्रमाला वसतीगृहातील विद्यार्थी, समाज कल्याण, जात पडताळणी व महामंडळाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.