नागपूरला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार – सुधीर मुनगंटीवार

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्या – सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

Ø नागपूरला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार

Ø विविध विभागांकडून घेतला अमृत महोत्सवी कामांचा आढावा

 

मुंबई / चंद्रपूर, दि. 6 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळेला प्राधान्य द्या, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोअर समितीची बैठक सोमवारी श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीत देओल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे आणि इतर विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षातील कार्यक्रम व उपक्रम याचा आढावा घेत असताना “यशदा” च्या माध्यमातून पुणे जवळील ताथवडे परिसरात अद्ययावत सुसज्ज सभागृह, प्रशिक्षणासाठी छोटी सभागृहे एका वर्षात पूर्ण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे एस. एन. डी. टी. विद्यापिठाचे उपकेंद्र निर्माण करून अमृत महोत्सवी वर्षात महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी 43 विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी 55 कोटीच्या निधीस मान्यता प्रदान करण्यात आली. या विद्यापीठ परिसरात महिला क्रांतीकारकाच्या आठवणी जागृत व्हाव्या, प्रेरक माहिती, चित्रकृती त्या भागात असावी, असे निर्देश देण्यात आले.

दिव्यांगासाठी नुकताच स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. अमृत महोत्सव वर्ष साजरे होत असताना दिव्यांगासाठी विशेष आणि नावीन्यपूर्ण योजना आखली जावी. ग्रामविकास विभागामार्फत ‘ महाराष्ट्र ग्रामविकास व संशोधन प्रबोधिनी‘ महारुद्र नागपूर येथे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थावर काम करणाऱ्या सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन या संस्थेतून चालेल. येत्या काही दिवसात या विषयासाठी स्वंतत्र बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात येत्या काळात विविध विभागामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विविध विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी नागपूर अधिवेशनात पुरवणी मागण्या करण्यात येतील. सामान्य प्रशासन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, नियोजन, सामाजिक न्याय विभागाने यावेळी सादरीकरण केले.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेनुसार राज्यात बंगाली, तेलगू अकादमीचा समावेश करणार : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यापूर्वी हिंदी, गुजराती आणि सिंधी अकादमी स्थापन करण्यात आल्या आहेत. आज महाराष्ट्रात मराठीसह विविध भाषा बोलल्या जातात. मराठी बरोबर हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगू आणि बंगाली लोक येथे राहतात. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात बंगाली आणि तेलगू अकादमी लवकरच स्थापन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.