जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्राला भेट.

????????????????????????????????????

जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्राला भेट.

मतदारांनी विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

भंडारा, दि. 2 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 राबविण्यात येत आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत असून मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रावर 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा तालुक्यात कारधा, वाकेश्वर, पहेला, पवनी तालुक्यात बाम्हणी, रुयाळ तसेच लाखांदूर तालुक्यातील मतदान केंद्राला आज भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी भंडारा आकाश अवतारे, साकोलीच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे, लाखांदूर तहसीलदार वैभव पवार, जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील उपस्थित होते.

मतदार यादी मधील मयत मतदार, कायम स्थलांतरीत मतदार, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांचे नाव वगळणे, लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे कमी करणे व ज्यांचे दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज घेणे. वयाची 17 वर्ष पूर्ण झालेले मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये अर्ज क्रमांक 6 भरून आगावू मतदार नोंदणी करू शकतात. परंतू वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व तलाठी यांच्या कडून माहिती जाणून घेतली.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामुळे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मयत व दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे, नावात दुरुस्ती करण्याची संधी पुनरीक्षण कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.