भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022-23 अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर त्वरीत अर्ज करण्याचे आवाहन
गडचिरोली,दि.01: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाही अशा शेतक-यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्याकरिता सन 2018-19 पासुन स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु झाली. तथापि कोवीड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या बचतीच्या धोरणामुळे सन 2020-21 व सन 2021-22 या वर्षासाठी आर्थिक लक्षांक देण्यात आलेला नव्हता. परंतु सन 2022-23 मध्ये स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविणेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली या 6 जिल्ह्यात सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची प्रक्रिया महाडीबीटी या प्रणालीद्वारे राबविण्याचे निर्देशित असल्यामुळे महाडीबीटी प्रणाली सुरु झाल्यापासून योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी मागील प्राप्त अर्ज व दिनांक 30 नोंव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणारे अर्ज यांची लॉटरी काढण्यात येणार आहे. किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्रमर्यादा फळबाग लागवडीकरिता अनुज्ञेय आहे. आंबा, काजु, पेरु, डाळींब, का.लिंबु, मोसंबी, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, अंजिर व चिकु इ. 16 बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत एकापेक्षा जास्त फळपिक लागवड शक्य आहे. मग्रारोहयो अंतर्गत 2.00 हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभ घेणे शक्य आहे. यापुर्वी रोहयो किंवा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेणे शक्य.
यासाठी लाभार्थी पात्रता ही महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाही असे शेतकरी, वैयक्तीक शेतक-यांनाच योजनेचा लाभ. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक. स्ंायुक्त उतारा असल्यास संमतीपत्राचे बंधन. जमिन कुळ कायद्याखाली येत असल्यास व 7/12 उता-यावर कुळाचे नाव असल्यास कुळाचे संमतीपत्र आवश्यक. प्राप्त अर्जामधुन सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड . अनुदान मर्यादा- 100% राज्य योजना . खड्डे खेादणे, कलमे/रोपे लागवड करणे, पिक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या करिता शासनाचे अनुदान देय.
• जमिन तयार करणे, माती व शेणखत/सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खते देणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडांचे कुंपण करणे इ. कामे पुर्ण करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.
• लाभार्थ्यास तीन वर्षाच्या कालावधीत 50:30:20 या प्रमाणात अनुदान देय आहे.
• लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहील्या वर्षी किमान 80% व दुस-या वर्षी किमान 90% जगविणे आवश्यक.
अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणीकरण
• महाडीबीटी पोर्टल च्या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करणे व आधार क्रमाकांचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक. सदर प्रक्रीया शेतक-यांना एकदाच करावी लागेल.
• महाडीबीटी पोर्टलचे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबीकरिता https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत. संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
• अर्जदार शेतक-याने पहिल्यांदा वापरकर्त्याचे नाव (युजर नेम) व संकेतशब्द (पासवर्ड) तयार करावा.
• अर्ज सादर करताना शेतक-यांनी 20 रुपयांचे शुल्क व 3.60 रुपयांची जीएसटी, असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन भरायचे आहेत, त्यानंतर महाडीबीटी महामंडळाकडे शेतक-यांचा अर्ज पुढील प्रक्रीयेसाठी जातो.
• अर्ज भरल्यानंतर शेतक-यांनी संपुर्ण अर्ज पुन्हा एकदा पडताळुन पाहायला हवा. अर्जदारास शेतक-याने अर्जात नमुद केलेल्या माहितीनुसार पूर्वसंमती रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहणार असल्याने अर्जातील माहिती अचुक असावी.
• योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतक-यांनी नोंव्हेंबर अखेरपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे.
आवश्यक कागदपत्रे
• 7/12 उतारा
• 8 अ उतारा
• सामाईक क्षेत्र असल्यास विहीत नमुन्यातील इतर खातेदारांची सहमती पत्र
• आधार कार्ड
• आधार लिंक बँक खाते क्रमांक
• माती परिक्षण अहवाल(कागदी लिंबु, संत्रा व मोसंबी या लिंबुवर्गीय फळपिकासाठी)
तरी फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतुने सुरु झालेल्या या योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घेणेकरिता नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन पध्दतीने https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोलीú यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली बसवराज भि. मास्तोळी यांनी कळविले आहे.