एचआयव्ही बाधितांना समानतेची वागणूक द्या – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके
Ø जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 1 : एड्स या आजाराविषयी समाजात अनेक गैरसमज असल्यामुळे एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींसोबत भेदभाव करण्यात येतो. मात्र इतर व्याधिग्रस्त तसेच सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींना त्यांचे सामाजिक व न्यायिक हक्क व अधिकार आहेत. कोणत्याही गैरसमजातून अथवा भेदभावातून एच.आय.व्ही. बाधितांचे हक्क न डावलता त्यांना समानेची वागणूक देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांनी केले.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित जनजागृती रॅली कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, रोटरीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, क्राईस्ट हॉस्पिटलचे फादर जोसेफ, फॉक्सिचे अध्यक्ष डॉ. अजय गांधी व डॉ. कविता गांधी, एआरटी नोडल अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी व डॉ. रफीक मावानी, कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. बोरकुटे, लिंक वर्कर प्रकल्पाचे प्रकल्प निर्देशक आशिष काळे, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नसीमा शेख, श्रीकांत रेशीमवाले यांची उपस्थिती होती.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बंडू रामटेके पुढे म्हणाले, एचआयव्हीचा प्रतिबंध करण्यासाठी व येणारी पिढी एड्स मुक्त राहावी यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी ‘आपली एकता, आपली समानता : एचआयव्ही सह जगणाऱ्यांकरीता’ या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी क्राईस्टचे फादर जोसेफ, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ.अमल पोद्दार यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करून एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीला शासनातर्फे तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली.
याप्रसंगी सर्वप्रथम एड्स विरोधी प्रतिज्ञेचे वाचन करून सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय ते जटपुरा गेट, ज्युबली हायस्कुल मार्गे एच.आय.व्ही. जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रम ठिकाणी संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्पांतर्गत पोस्टर प्रदर्शनी व एचआयव्ही विषयक माहिती पत्रकाचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच संबोधन ट्रस्टच्या कमचा-यांनी एड्स जनजागृती संदर्भात रांगोळी काढली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा सामान्य रूग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला आयसीटीसी व एआरटी व सुरक्षा क्लीनिकच्या राखी देशमुख, शालिनी धांडे, शारदा लोखंडे, वैशाली गेडाम, साहेबराव हिवरकर, राकेश दुर्योधन, प्रतिभा नगराळे, किरन बोरकर, देवेंद्र लांजे, समीर खान, सोनाली चौधरी, हेमचंद उराडे, संगिता रामेरकर, लिंक वर्कर प्रकल्पाचे रोशन आकुलवार, नोबल शिक्षण संस्थेचे डॉ. पवन मार्कंडेवार, अनिल उईके, संबोधन ट्रस्ट चे राज काचोळे, विहान प्रकल्पाच्या जोसेफ डोमाला, संगिता देवाळकर, जनहिताय मंडळ चे बिरेंद्र कैथल व सर्व कर्मचा-यांची उपस्थिती होती.