जिल्हाधिका-यांनी घेतला ब्रम्हपूरी उपविभागाचा आढावा
Ø जवाहर नवोदय विद्यालय येथे मॅथ पार्कचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 1 : जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून उपविभागनिहाय आढावा घेणे सुरू आहे. याअंतर्गत त्यांनी मंगळवारी ब्रम्हपूरी उपविभागांतर्गत सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतला तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या.
सुरवातीला सर्व विभागाची माहिती जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले, गतीमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याकरीता महसूल विभागाच्या इमारतींचे बांधकाम, तलाठी कार्यालय बांधकाम, फर्निचर खरेदी व दुरुस्ती तसेच तालुकास्तरीय इतर विभागांनीसुध्दा कार्यालयीन कामाकाजाबाबतचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करावे. विविध विभागाकडे प्रलंबित कामे किंवा प्रस्ताव असल्यास 31 डिसेंबर 2022 पर्यंत ते प्राधान्याने निकाली काढावेत.
महसूल विभागाने महत्वाची फाईल (के.आर.ए) बाबतची माहिती अद्ययावत ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन इमारतींची शिल्लक कामे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच इतर विभागानेसुध्दा आपल्याकडील प्रलंबित कामांचा त्वरीत निपटारा करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
यावेळी त्यांनी रणमोचन येथील रेतीघाट, ब्रम्हपूरी येथील वखार मंडळाचे धान्य गोदाम आणि गोसीखुर्द उजवा कालवा येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता संदीप हासे (गोसीखुर्द), तहसीलदार उषा चौधरी (ब्रम्हपूरी), तहसीलदार मनोहर चव्हाण (नागभीड), न.प. मुख्याधिकारी आर्शिया जुही (ब्रम्हपूरी), राहुल कंकाळ (नागभीड), पुरवठा निरीक्षक अमित कांबळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जवाहर नवोदय विद्यालयाला भेट : नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापुर) येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नवोदय विद्यालयाला भेट देऊन ‘मॅथ पार्कचे’ उद्घाटन केले. नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या जिल्हाधिका-यांच्या सन्मानार्थ विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य मिना मनी यांनी केले. संचालन शिक्षिका शुभांगी यादव यांनी तर आभार शिक्षक सुनील उराडे यांनी मानले. यावेळी नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण, माजी प्राचार्य विनोदकुमार सायबेवार तसेच जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.