जिल्ह्यातील 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत
चंद्रपूर, दि. 30 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता तसेच त्यानंतर नोकरीकरिता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष अभियान राबविण्यात येवून 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध 139 महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे 5286 तर व्यावसायीक अभ्यासक्रमाचे 2646 असे एकूण 7932 प्रकरणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त झाले होती. त्यापैकी सुमारे 90 टक्के म्हणजे 7156 विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. यापैकी पाच हजार अर्ज हे माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत महाविद्यालय स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून निर्गमित करण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात अकरावी विज्ञान शाखेचे 8971 व बारावी विज्ञान शाखेचे 8397 विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्चनंतर पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या नोंदणीकरिता जातवैधता प्रमाणपत्र लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्र डिसेंबरपर्यंत निर्गमित करण्यात येतील. तसेच 11 वीच्या विद्यार्थ्यांनादेखील माहे डिसेंबरपासून वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.