शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

 

भंडारा, दि. 25: प्रधानमंत्री पिक विमा योजना आता बीड पॅटर्ननुसार राबविली जाणार असून राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. बीड पॅटर्न लागु केल्याने आता शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. ही योजना सन 2022-23 रब्बी हंगामापासून राबविण्यात येत असून रब्बी हंगामासाठी गहू व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2022 पर्यंत तर उन्हाळी धान पिकासाठी 31 मार्च 2023 पर्यंत पिक विमा हप्ता भरून योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी कळविले आहे.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी) सन 2022-23 अंतर्गत गहू, हरभरा व उन्हाळी धान या पिकांसाठी जाखिमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. अधिसूचित क्षेत्र, पिके, विमा हप्ता व योजनेच्या ईतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स मोबाईल ॲप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेत तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून योजनेबाबतची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना मोबाईलवर पाहता येईल.

 

या योजनेअंतर्गत प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड ईत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट या आपत्तीमुळे होणारे नुकसान, ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते त्यांचे झालेले नुकसान या करिता नुकसान भरपाई देय राहील.

 

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार या दोन्ही शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी नोंदणीच्या अंतिम दिनांकाच्या सात दिवस आधी घोषणापत्र बँकेत सादर करणे आवश्यक राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करायचे आहे. सदर अर्ज बँक, कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँक, आपले सरकार सेवा केंद्र व विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सादर करून विमा हप्ता भरायचा आहे.