‘स्पर्धा परिक्षेतील तयारीचे टप्पे’ यावर जिल्हा कौशल्य विकासतर्फे समुपदेशन
चंद्रपूर, दि. 17 : स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी मोघम स्वरुपाचे वाचन न करता मुद्देसुद व परिक्षेचा अभ्यासक्रम जाणून त्यानुसार तयारी करावी, असे मार्गदर्शन प्राध्यापक डॉ. दिलीप चौधरी, यांनी जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे आयोजित समुपदेशन कार्यक्रमात केले.
स्पर्धा परिक्षा व तयारीचे टप्पे या विषयावर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 15 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. चौधरी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोजगार व मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत उपस्थित होते.
प्रा. दिलीप चौधरी यांनी आपल्या समुपदेशन सत्रात विद्यार्थ्याना स्पर्धा परिक्षाची तयारी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तसेच कोणते संदर्भ ग्रंथ वाचावे याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यानी अपयश आले तरी खचून न जाता आपले ध्येय साध्य करावे, असे सांगितले. रोजगार व मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत व विजय गराटे यांनी देखील विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा थेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमरीन पठाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा यांची जंयती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ग्रंथालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.