राज्यातील गड – किल्ल्यांच्या विकासावर भर देणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 16 : रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ला विकासासाठी पर्यटन विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.त्याचबरोबर राज्यातील सर्व गड – किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांना दिली.
राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री.लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती, पर्यटन सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी,सहसंचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याला सन २०२४ मध्ये या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा इतिहास रूपी माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील तसेच याठिकाणी लेझर शोचे देखील आयोजन करण्यात येईल. प्रतापगडाबरोबरच राज्यातील इतर गड किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ला हा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ला परिसरात सुरू असलेल्या विकासकामांबाबत पर्यटन विभाग मदत करेल.राज्यातील सागरतटीय क्षेत्रातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी शासन आग्रही आहे.याबाबतीत आलेल्या सूचनांबर नक्कीच काम करू, असेही त्यांनी सांगीतले .
रायगड विकास प्राधिकरणमार्फत सुरू कामांसाठी पर्यटन विभागाचे सहकार्य आवश्यक : संभाजी राजे छत्रपती
रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती म्हणाले,नवीन शासन छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे ही अत्यंत चांगली बाब आहे. रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ला व परिसरात विविध विकासकामे चालू आहेत. त्यातील अनेक कामांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीची अपेक्षा आहे.किल्ले रायगड वरील दोन निवासी खोल्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असुन आहे सहयोग करारानुसार हस्तांतर लवकर करावे. तसेच जे बांधकाम पूर्ण झाले आहे ते देखील प्राधिकरणास प्राप्त झाले तर तेथे पर्यटक कक्ष, माहिती कक्ष , संग्रहालय , माहिती कक्ष उभ्यारण्यास मदत होईल.
संभाजी राजे छत्रपती म्हणाले, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी खाली पाचाड येथे 88 एकर जागा रायगड प्राधिकरणाने संपादित केली आहे जेथे शिवसृष्टी,मराठा संशोधन केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, अत्याधुनिक संग्रहालय यांची उभारणी होणार आहे. एमटीडीसी मार्फत येथे सामंजस्य कराराद्वारे पर्यटक निवास व सुविधा केंद्राची उभारणी व्हावी. महाड रायगड हा राष्ट्रीय महामार्ग हेरिटेज हायवे करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात हेरिटेज हायवेचा प्रस्ताव सुध्दा प्राधिकरणास प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये जलवाहतूक, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट इ. गोष्टी अंतर्भूत आहेत. एमटीडीसी,रायगड प्राधिकरण, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय यांचे करारद्वारे येथे पीपीपी मॉडेल अंतर्भूत करून प्रकल्प पूर्ण करण्यात येऊ शकतो का तसेच याबाबतही कार्यवाही करता येईल का ते पहावे अशा सूचना संभाजी राजे छत्रपती यांनी केल्या.