लम्पीला रोखण्यासाठी आता ‘स्वच्छ गोठा’ मोहीमपशुसंवर्धन विभाग करणार महिनाभर बाधित जनावरांचे सर्वेक्षण

लम्पीला रोखण्यासाठी आता ‘स्वच्छ गोठा’ मोहीमपशुसंवर्धन विभाग करणार महिनाभर बाधित जनावरांचे सर्वेक्षण

भंडारा, दि. 16 : दिवसेंदिवस लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून पशुधनाच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. याला अटकाव करण्यासाठी राज्यभर पशुसंवर्धन विभागाने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा ’ ही मोहीम सुरु केली आहे.

७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर याकालावधीत ही मोहीम सुरु आहे. मागील महिन्यात सलग पाऊस असल्याने जनावरांची प्रतिकार शक्ती कमी झाली. जिल्ह्यात मोठ्या गायी जनावरांचे ९९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु जी वासरे ४ महिन्यापेक्षा लहान होते त्याचे लसीकरण शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार सुरु असून पशुपालकांनी लसीकरण करून घ्यावे. यामुळे जनावरे बाधित होण्यापासून प्रतिबंध करण्यास उत्तम उपाय आहे. त्याचप्रमाणे रोगाचा प्रसार गोचीड, गोमाशा व चावा घेणाऱ्या किटकामुळे होत असतो. त्यामुळे या रोगाचे संसर्गाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने राज्यात पशुसंवर्धन विभागाने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम सुरु केली आहे.

 

जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत असून राज्यातील बाधित शहरे, गावे, वाड्यावस्त्या, पाडे व तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लम्पी पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय व अनुषंगिक आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीमध्ये बाधित गावामध्ये गोठा भेटी देण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार केली जाणार आहे. एका पथकामध्ये १ पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतीकडील २ स्वयंसेवक असतील. पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देईल असे डॉ. सुशील भगत व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांनी कळविले आहे.