गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 1 लक्ष 28 हजार शेतक-यांना एसएमएस Ø गावदवंडी, फ्लॅश कार्डच्या माध्यमातून जनजागृती

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 1 लक्ष 28 हजार शेतक-यांना एसएमएस

Ø गावदवंडी, फ्लॅश कार्डच्या माध्यमातून जनजागृती

चंद्रपूर दि. 15 : जिल्ह्यात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र 1 लक्ष 60 हजार 609 हेक्टर असून 2022 – 23 या वर्षात 1 लक्ष 74 हजार 962 क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत कापूस पीक बोंड अवस्थेत आहे, तसेच कापूस वेचायला प्रारंभ झाला आहे. मात्र गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृषी विभागामार्फत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने एम – किसान पोर्टलवरून जिल्ह्यातील 1 लक्ष 28 हजार 265 शेतक-यांना कापूस पिकाचे 15 एसएमएस पाठविण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात कपाशीची सर्वाधिक पेरणी वरोरा तालुक्यात 32090 हेक्टरवर झाली आहे. यानंतर कोरपना (26492 हेक्टर), राजूरा (25824 हेक्टर), चिमूर (24454 हेक्टर), भद्रावती (16608 हेक्टर), गोंडपिपरी (15942 हेक्टर), जिवती (12344 हेक्टर), चंद्रपूर (9825 हेक्टर), पोंभुर्णा (5519 हेक्टर), बल्लारपूर (3483 हेक्टर), मूल (1543 हेक्टर), सावली (711 हेक्टर), ब्रम्हपूरी (67 हेक्टर), सिंदेवाही (37 हेक्टर) आणि नागभीड तालुक्यात 24 हेक्टर अशी एकूण 1 लक्ष 74 हजार 962 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.

 

सद्यस्थितीत कपाशीला बोंडे आली असून गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. यात 1 लक्ष 28 हजार 265 शेतक-यांना एसएमएस पाठविण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस विकास कार्यक्रमांतर्गत 8200 फेरोमेन ट्रॅप व 16022 ल्युर्सचे शेतक-यांना वाटप करण्यात आले आहे. याशिवाय क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पीक लागवड करीत असलेल्या तालुक्यांमध्ये 280 निश्चित प्लॉटकरीता 1120 फेरोमेन ट्रॅप व 3360 ल्युर्सचे वाटप, गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे 160 फ्लॅशकार्ड तयार करण्यात आले असून कापूस पिकाच्या क्षेत्रातील कृषी सहाय्यकांना देण्यात आले आहे. क्रॉपसॅप योजनेंतर्गत आपात्कालीन परिस्थितीकरीता 150.5 लीटर इमामेक्टीन बेन्झोएट या रासायनिक किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला आहे.

 

क्रॉपसॅप अंतर्गत जिल्ह्यातील क्षेत्रीय स्तरावरील 221 कृषी सहाय्यकाद्वारे 14504 व 50 कृषी पर्यवेक्षकांद्वारे 3200 पीकनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यामार्फत 2556 गाव बैठकासुध्दा घेण्यात आल्या. गुलाबी बोंडअळी निर्मुलनाकरीता 137 गावांमध्ये दवंडी देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. ब-हाटे यांनी दिली.

 

गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे शेतक-यांना आवाहन : कपाशीचे फरदळ घेण्याचे टाळावे. हंगाम संपल्यानंतर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. शेतातील पिकांचे अवशेष वेचून जाळून टाकावे व पुढील हंगामाअगोदर सर्व पऱ्हाटीचा नायनाट करावा. अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके कपाशीपुर्वी किंवा नंतर घेऊ नयेत व पिकांची फेरपालट करावी. कपाशी पिकात आश्रय ओळी लावाव्यात. पिकांचे नियमित सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंडळीसाठी हेक्टरी किमान पाच कामगंध सापळे वापरावे. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावे. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 120 ते 130 दिवसाचे झाल्यावर ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड कपाशीत लावावेत. गुलाबी बोंडअळी ही बोंडामध्ये असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही, त्यामुळे नियमित सर्वेक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.