चंद्रपूर ११ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मनपा शाळा शिक्षकांची चार दिवसीय सक्षमीकरण कार्यशाळा १० नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर केंद्र शासन चेतना विकास,मूल्य शिक्षण अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत ८० मनपा शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यशाळेत विविध मानवी मूल्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. तज्ञ मार्गदर्शकांनी मानवी जीवन सुखी होण्यासाठी मूल्य का आवश्यक आहेत याविषयी विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होऊन विद्यार्थ्यांची व पर्यायाने शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून उद्धव राठोड, प्रशांत येवले, रवी तामगाडगे यांनी मार्गदर्शन केले.
सदर समारोपीय कार्यक्रमाला उपस्थीत सहायक आयुक्त विद्या पाटील म्हणाल्या की, विद्यार्थिदशेचा कालावधी हा मूल्ये आणि संस्कार रुजवण्याचा असतो. या अवस्थेत पालक, शिक्षक आणि कौटुंबिक सदस्य यांचा प्रभाव होत असतो. या अवस्थेत मुले अत्यंत खेळकर आणि सकारात्मक असतात. त्यांना आपण जसे प्रवाहीत करू त्या प्रमाणे ती तयार होतात. जेवढा पाया भक्कम तितके जीवन सुखकर. त्यामुळे उद्याचे सुजाण नागरीक घडविण्यात शिक्षकांचा वाटा मोठा आहे.
या प्रसंगी मनपा प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नित उपस्थित होते. सहायक आयुक्त यांच्या हस्ते तज्ञ मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उमा कुकडपवार तर आभार प्रदर्शन स्वाती बेत्तावार यांनी केले.