फॅशन स्ट्रीट वरील नुकसानग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत – दीपक केसरकर
मुंबई, दि. 9- मुंबई शहरातील फॅशन स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपड्यांच्या बाजारातील 23 दुकानांना शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मंत्री श्री.केसरकर यांनी आज फॅशन स्ट्रीट येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. त्यानंतर दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. श्री.केसरकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात आपण चर्चा केली असून ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व दुकानांचे सविस्तर पंचनामे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री मदत निधी कक्षास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर संबंधित दुकानदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.’’
रस्त्यावर व्यवसाय करताना अशा घटनेमुळे नुकसानग्रस्तांचे जीवनमान उध्वस्त होत असते. हे विचारात घेऊन त्यांना पुन्हा व्यवसाय करता यावा यासाठी ही मदत दिली जात असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.