सितेपार येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची राज्यस्तरीय तपासणी
गावाने लोकसहभागातून राबविलेल्या विविध सार्वजनिक उपक्रमांची पाहणी
राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती
भंडारा, दि. 7 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा (सन 2019-20) या वर्षातील राज्यस्तरीय तपासणी काल रविवारी (6 नोव्हेंबर) ला मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत सितेपार येथे पार पडली. तपासणीकरीता राज्यस्तरीय समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी तथा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव चंद्रकांत मोरे, समितीचे सदस्य तथा पाणी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, समितीचे सदस्य तथा पाणी पुरवठा विभागाचे सहायक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांची उपस्थिती होती. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषदेच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा (सन 2019-20) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आले.
काल रविवारी राज्यस्तरीय समितीचे गावात आगमन होताच मुख्य प्रवेशद्वारावर सरपंच मंजुषा झंझाड व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी शेकडों नागरिकांच्या उपस्थितीत कुमकुमतिलक करून व पुष्पगुच्छ देऊन समितीचे स्वागत केले. गावातील मुख्यचौकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून राज्यस्तरीय तपासणीला सुरूवात करण्यात आली.
सर्वप्रथम बौध्दविहार परिसरात मान्यरांचे आदरातिथ्य करणारा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी तथा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव चंद्रकांत मोरे, समितीचे सदस्य सचिव बाळासाहेब हजारे, समिती सदस्य राजेश पात्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत, गट विकास अधिकारी पल्लवी वाडेकर, सरपंच मनिषा झंझाड, उपसरपंच महादेव झंझाड, माजी सरपंच विजय झंझाड, पंचायत समिती सदस्य कैलास झंझाड, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चेटकुले, विस्तार अधिकारी तेलमासरे, ग्रामसेवक गोपाल बुरडे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अजय गजापुरे, गजानन भेदे, तसेच ग्राम पंचायत पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, गट संसाधन केंद्र व अंमलबजावणी सहाय संस्थेच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. राज्यस्तरीय समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी चंद्रकांत मोरे, समिती सदस्य सचिव बाळासाहेब हजारे, समिती सदस्य राजेश पात्रे यांचा ग्राम पंचायत व गावकऱ्यांच्या वतीने शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत मोरे यांनी, गावात स्वच्छतेचे यशस्वी कार्य केलेल्या ग्राम पंचायत पदाधिकारी व काही नागरिकांना मंचावर बोलवून त्यांचे कार्य जाणून घेतले आणि त्यांच्या कार्याचे कौतूक करून सत्कार केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत् गावात करण्यात आलेल्या विविध सार्वजनिक व वैयक्तिक पाणी व स्वच्छता विषयक उपक्रमांची पहाणी केली. सर्वप्रथम प्राथमिक शाळेला भेट देण्यात आली. समिती अध्यक्ष व सदस्यांनी चिमुकल्यांशी पाणी व स्वच्छते बाबत संवाद साधला. हातधुण्याचे महत्व, पध्दती याबाबत माहिती विचारली. चिमुकल्यांनी हातधुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवित समिती सदस्यांची वाहवा मिळविली. शाळेतील शौचालयाची पहाणी केल्यानंतर अंगणवाडीला भेट दिली. यावेळी अंगणवाडी सेविका यांचे सोबत चर्चा करून पिण्याचे पाणी तसेच बालकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत माहिती घेवून काही उपक्रमांची पहाणी केली. गावात उभारण्यात आलेल्या प्लास्टिक साठवन केंद्र व गांडूळ खत प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सार्वजनिक, वैयक्तिक घनकचरा व सांडपाणी तसेच पिण्याच्या पाण्याकरीता नळ कनेक्शन बाबत माहिती जाणून घेतली. सार्वजनिक स्वच्छतासह विविध उपक्रमांची पहाणी झाल्यानंतर गावात गृहभेटी द्वारे कुटूंबांशी संवाद साधला. घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे करता?, वैयक्तिकस्तरावर सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे?, कचरा वेगवेगळा केल्या जातो का?, कचरा कोठे टाकतात, कचरापेट्या आहेत का ?, जमा झालेला कचरा गोळा करण्याकरीता वाहन कधी येते, शौचालय कोणत्या प्रकारचा आहे व कुटूंबातील सर्व सदस्य वापर करतात का ?, नळ कनेक्शन आहे का, नळांना वॉटर मिटर बसविण्यात आले आहे का ? आदी बाबींबाबत संवाद साधून सर्व सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
सार्वजनिक शौचालय, नागरिकांकरीता सार्वजनिक स्थळी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक हॅंडवाश स्टेशनला भेट देऊन त्याचा वापर होतो काय, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे की नाही याबाबत पहाणी करून ग्राम पंचयत पदाधिकारी, सचिव यांचेकडून माहिती घेतली. गावातील वृक्ष लागवड,बंदीस्त गटात व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक ठिकाणांच्या सांडपाण्याकरीता उभारण्यात आलेल्या शोषखड्यांच्या पहाणी करण्यात आली. गावातील सार्वजनिक व वैयक्तिक स्तरावर उभारण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी केल्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयात सर्व कामांच्या, उपक्रमांच्या दस्ताऐवजांची तपासणी सरपंच मंजुषा झंझाड व ग्रामसेवक श्री बुरडे यांचेकडून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आरोग्य अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेण्यात आली.
सितेपार गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची राज्यस्तरीय संपूर्ण तपासणी झाल्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाने तपासणी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी सरपंच, सचिव, चपराशी यांनी लोकसहभागातून गावात केलेल्या कामांचा गौरव म्हणून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंतांचे गाव घडविणारे विचार सितेपार गावात देऊन कार्य करणाऱ्या शेंडे महाराज यांचाही राज्यस्तरीय समिती अध्यक्ष चंद्रकांत मोरे व समिती सदस्यांच्या वतीने गौरव करण्यात आला. राष्ट्रसंतांच्या विचाराचे पाईक असलेले शेंडे महाराज यांनी खंजेरीच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या भजनांने गायन केल्यानंतर तपासणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
तीन ज्येष्ठ महिलांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकीन मशिन व ऑरोचे लोकार्पण
==============
ग्राम पंचायतच्या वतीने गावातील नागरिकांकरीता पिण्याचे थंड पाणी उपलब्ध होण्याकरीता ऑरो उभारण्यात आले. तसेच महिलांकरीता सॅनिटरी नॅपकीन मशिन लावण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांचा लोर्कापण सोहळा राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांचे हस्ते गाव तपासणी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. मात्र ज्या महिला व नागरिकांनी गावाला घडविण्यात मौलाचा वाटा उचलला आहे. त्या गावकऱ्यांच्या कार्याची दखल घेत गावातील जेष्ठ महिलांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकीन मशिन व ऑरोचा लोर्कापण गावातील ज्येष्ठ महिलांच्या वतीने करण्यात आला. समितीच्या उपस्थितीत जेष्ठ महिला जमनाबाई ठवकर, वच्छळा सार्वे व कुसूमबाई झंझाड यांनी फित कापून दोन्ही सुविधांचे लोर्कापण केले. या स्तुत्य उपक्रमाचे समिती अध्यक्षांच्या वतीने कौतूक करण्यात आले. तर समितीच्या अध्यक्षांनी लोर्कापण करण्याची संधी दिल्याने समिती अध्यक्षांचे ज्येष्ठ महिलांनी अभिनंदन केले.