स्वच्छता मोहीमेत तुमचा सहभाग आहे का ? ५२ टीम करत आहे स्वच्छता / आपल्या परीसरातील टीमशी करा संपर्क
चंद्रपूर ५ नोव्हेंबर – शहर स्वच्छ करण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन महानगरपालिकेतर्फे आयोजित ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग ” स्पर्धेत ५२ टीम सहभागी होऊन शहरातील ४६ जागी स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्याचे निश्चित झाले आहे. प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविली जात असुन समाजातील सर्वच क्षेत्रांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
जर आपल्या परीसरातील स्वच्छतेसंदर्भात काही तक्रार असेल तर मनपाच्या तक्रार निवारण अँपवर तक्रार कराच पण आपल्या परीसरातील टीम स्वच्छता स्पर्धेत सहभागी आहे की नाही याची पण खात्री करा. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर वार्डस्तरीय स्पर्धा सुरु झाली असुन विजेत्या टीम्सना अनुक्रमे १ लक्ष,७१ हजार,५१ हजार व ट्रॉफी अशी बक्षिसे असून त्या विजेत्या वॉर्डसाठी अनुक्रमे २५ लक्ष,१५ लक्ष, १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे आपल्या परीसरात विजेते गटांना करता येणार आहे. तसेच टाकाऊपासुन टिकाऊ अश्या नाविन्यपुर्ण वस्तु ( Using Waste to Create Best ) बनविणाऱ्या गटांना सुद्धा २१ हजार रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
स्वच्छता मोहीमेत लोकसहभाग वाढावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने सर्व नागरीकांचा यात सहभाग असणे महत्वाचे आहे. या मोहीमद्वारे नागरिक आपल्या परीसरातील नको असलेली कचरा टाकण्याची जागा, स्वच्छता व सौंदर्यीकरणाद्वारे संपवु शकतात. कचरा टाकण्यास असलेली एखादी जागा प्रशासनाने बंद करणे आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद करणे यात मोठा फरक आहे.
आज मर्दानी टीम,योग नृत्य परिवार,चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती,अप सायकलींग चंद्रपूर,शहीद भगतसिंग ग्रुप,गायत्री नगर महिला मंडळ,एकता महिला मंडळ,संत गाडगेबाबा महाराज युवा संघ,स्नेहराई संघ, जेष्ठ नागरिक संघ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघ,स्वराज फाऊंडेशन,वानर सेना मित्र परीवार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्वच्छता मंडळ, नेहरू नगर मित्र परीवार इत्यादी ५२ संस्था यात कार्यरत असुन या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात नागरीकांचा सहभाग असल्याने मोठे प्रश्नही सहजतेने सोडविले जाऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होऊन स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.