हर हर महादेव’ चित्रपटाचा विशेष शो मान्यवरांसाठी आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.3 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुढील आठवड्यात या सिनेमाचा विशेष शो राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य मंत्री, आमदार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.
‘हर हर महादेव’ चित्रपटाची टीम आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी आली होती. ‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुबोध भावे, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकर, चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे, निर्माते सुनील फडतरे, झी स्टुडिओचे प्रमुख मंगेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरातील चित्रपटगृहात एकाच वेळी हा चित्रपट दाखविण्याचे नियोजन करण्यात येईल. तरुण पिढीला विशेषत: शालेय विद्यार्थ्यांसाठी या विशेष शोचे आयोजन कसे करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात येईल.
झी स्टुडिओजची निर्मिती असलेला मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाला एकात्मिक वस्तू/माल आणि सेवा कर यामधून सुट देता येईल का याबाबतही तपासले जाईल.