कंत्राटदार व वृक्षतोड करणाऱ्यांना कारवाई प्रस्तावित
गडचिरोली, दि.02: कोरेपल्ली ते आशा (ता.अहेरी) या सिरोंचा वनविभागाच्या कमलापुर वनपरिक्षेत्रातुन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे जागी डांबरी रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली (PWD) यांनी वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत वन विभागाचे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेला होता. त्यान्वये कोरेपल्ली ते आशा या रस्त्याला वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत दिनांक 28.02.2022 अन्वये 1 ते 25 अटिंच्या अधिन राहून केद्र शासनाने तत्वतः मंजुरी प्रदान केलेली आहे. परंतु 28.02.2022 पासुन आजतागायत सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली(PWD)यांनी रक्कम भरणा व 1 ते 25 अटी व शर्ती पुर्ण केलेल्या नाही. अटि व शर्ती पुर्ण न केल्यामुळे सदर प्रस्तावास केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळालेली नाही व सदर रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली यांचेकडून मिळालेल्या माहिती नुसार सदर कामाचे कंत्राट वनविभागाच्या मान्यते अगोदरच काढले असून एम.एस.वालीया ब्रदर्स गोंदिया यांना आवंटित झालेले आहे.
वरिल प्रस्तावित रस्त्याचे जागेवर दिनांक 06.09.2022 रोजी ला मौजा आशा व नैनेर येथील 55 इसमांनी कमलापुर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र-कोडसेपल्ली 2 मधील कक्ष क्रमांक 109, 111, 112 चे प्रस्तावित रुंदीतील लहान-मोठ्या 162 झाडांची अवैध तोड केली. त्यान्वये वन गुन्हा क्रमांक 08584/04 दि.06.09.2022 नोंदविण्यात आलेला आहे. त्यानंतर दिनांक 09.09.2022 रोजी कवठाराम येथील 29 गावकऱ्यांनी मिळून वरिल नमुद प्रस्तावीत रस्त्याच्या कक्ष क्रमांक 120,93,94च्या प्रस्तावित रुंदीतील लहान-मोठ्या 267 झाडांची अवैध तोड केली. त्यान्वये आरोपीविरुध्द वनगुन्हा क्रमांक 08585/06 दि.10.09.2022 आणि वन गुन्हा क्रमांक 08628/03 दि.10.09.2022 नोंदविण्यात आला.
सदर अवैध वृक्ष तोडीबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी चौकशी केली असता चौकशीमध्ये गावकऱ्यांकडून पुढीलप्रमाणे माहिती मिळाली. रस्त्याचे कामाबाबत संबंधित कंत्राटदारांनी आशा ते कोडसेपल्ली हा रस्तापुर्वीपासुन मंजुरअसल्याचे खोटी माहिती गावकऱ्यांना दिली. परंतु वनविभागाची झाडे रस्त्यात असल्याने काम सुरु होत नसल्याचे सांगून गावकऱ्यांची दिशाभूल केली. सदर रस्त्यात येणारी झाडे गावकऱ्यांनी तोडुन दिल्यास रस्ता पूर्ण करुन देवू असे त्यांना सांगीतले. त्यानुसार आशा, नेनेर व कवठाराम येथील गावकऱ्यांनी पोळयानंतरचा दिवस ठरवून माहे-ऑगस्ट चे शेवटच्या आठवडयात संघटितरित्या अवैध वृक्षतोड केली. वरिल वन गुन्हयामध्ये नमुद गावांचे गावकरी व कंत्राटदार यांना आरोपी म्हणून त्यांचे विरूध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलमान्वये वन गुन्हा दाखल केलेला आहे. गावकऱ्यांचे बयाण नोंदविले गेले असून सर्वांना गुन्हा मान्य आहे. तसेच अवैध कटाई झालेला माल जागेवरच आहे व कोणतीही चोरी झालेली नाही. सदर घटनानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना समज देण्यात आली व सदर रस्त्यांची मंजुरी अद्याप झालेली नसल्याची माहिती देण्यात आली. चौकशी दरम्यान कंत्राटदार एम.एस.वालीया रा.गोंदिया, रमेश प्रकाश दलाई रा. नागेपल्ली व अधिक तपासानंतर गुड्डू प्रभाकर कुलकर्णी (गौरव प्रभाकर मगर)रा. आलापल्ली यांची नावेसमोर आली. यामध्ये रमेश दलाई व गुड्डू कुलकर्णी यांनी गावकऱ्यांना वृक्षतोड करण्यासाठी प्रोत्साहीत केल्याचे तपासादरम्यान समोर आले. गुड्डू प्रभाकर कुलकर्णी यांनी त्यांच्या बयाणात गावात जावून लोकांना वृक्षतोड करण्यासाठी सांगीतल्याचे मान्य केलेले आहे. रमेश दलाई हे चौकशीदरम्यान व ओळख परेड मध्ये गैरहजर राहून तपासात सहकार्य करित नसल्याचे दिसते. तसेच प्रमुख कंत्राटदार एम.एस.वालीया रा.गोंदिया यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वरिल वन गुन्हयात किती सहभाग आहे याबद्दल तपास सुरु आहे. वन गुन्हया बरोबरच आशा, नैनेर व कवठाराम येथील वन गुन्हयात सामील गावकरी व कंत्राटदार यांचेविरूध्द शासकिय मालमत्तेची नुकसान केल्याबद्दल उपपोलीस स्टेशन राजाराम व दामरंचा येथे तक्रार दाखल करण्यातआलेली आहे. सदर कंत्राटदारांच्या मनमानीचे व वनसंपदेचे नुकसान करणाऱ्या या कृत्याचे वनविभागाने गंभीर दखल घेतलेली आहे. दोषी कंत्राटदार व गावकऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. तसेच वनपरिक्षेत्र स्तरावर कर्मचाऱ्यांच्या कामात कसुर झाला अथवा कसे याबाबत विभागीयरित्या नियमानुसार कारवाई सुरु आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली (PWD) यांना ही सदर प्रकरणाबाबत अवगत करुन सहकार्य करण्याबाबत कळविले आहे. पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी, अहेरी व वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापुर हे करित आहे. असे उपवनसंरक्षक सिरोंचा वनविभाग, सिरोंचा यांनी कळविले आहे.