31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत कायदेविषयक जनजागृतीद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण अभियान Ø विधीसेवा प्राधिकरणचा उपक्रम
चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्फत ‘हक हमारा भी तो है @ 75’ व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांचे सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. उपरोक्त दोन्ही अभियान सर्व राज्यात, सर्व जिल्ह्यात आणि सर्व तालुका स्तरावर राबविले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.
नागरिकांचे सशक्तीकरण अभियानाचे उद्घाटन जिल्हा न्यायालयात ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृध्दी एस. भीष्म, तसेच सर्व न्यायाधीश, विधी शाखेचे विद्यार्थी आणि वकील उपस्थित होते.
‘हक हमारा भी तो है @ 75’ या अभियानांतर्गत जिल्हा कारागृहातील सर्व बंदी कैद्यांची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच बंदींना कायदेविषयक सहाय्य हवे असल्यास ते दिले जाईल. झालेल्या निर्णयाविरुध्द बंदिंना अपील करावयाचे असल्यास जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, चंद्रपूर तर्फे मोफत मिळणा-या वकिलामार्फत करू शकतील.
नागरिकांचे सशक्तीकरण या अभियानानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीमार्फत ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना कायदेविषयक माहिती दिली जाईल. तसेच दारोदारी कायदेविषयक माहितीचे पत्रके वाटप करून वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने कळविले आहे.