कृषी केंद्र धारकांनी खताची जादा दराने विक्री करू नये : अरूण बलसाने
भरारी पथकाची धडक मोहीम, 14 कंपन्याचे खतास विक्री बंद आदेश ; सहा खत परवाने निलंबीत
भंडारा दि.8 : कृषी विभागाने केलेल्या धडक मोहिमेत 14 कंपन्यांच्या खतास विक्री बंदीचे आदेश देण्यात आले असून 6 खत विक्री केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
लाखनी तालुक्यात 84 खत विक्री परवानाधारक असून लाखनी तालुक्यात एकुण 1150 मे.टन रासा. खते उपलब्ध आहेत. खताचा प्रकार /ग्रेड उपलब्ध साठा मे.टन युरीया 288, डी.ए.पी.26, 20:20:0:13 -368, 15:15:15-48, एस.एस.पी. 321 इतर सर्व संयुक्त व मिश्र खते-99 एकुण एकंदर 1150 वरील प्रमाणे लाखनी तालुक्यात रासा.खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून रासा.खताचा तुटवडा नाही .
कृषि केंद्र धारक नियमांचे कटाक्षाने पालन करीत आहेत किंवा नाही याची धडक मोहीम जिल्हा भरारी पथकाव्दारे राबविण्यात आली .या तपासणी मोहीमेत पॉस मशिनप्रमाणे साठा जूळत नसणे, साठा व दर फलक अद्यावत नसणे, साठा पुस्तक अदयावत नसणे , शेतकऱ्यांना एम फॉर्म ची व पॉस मशिनची पावती न देणे, खत कंपन्यांचा परवान्यात समोवश असणे ,खरेदी केलेल्या खताची साठा पुस्तकात नोंद नसणे , शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या बिलावर पी.डी.एम. असे न लिहीता पोटॅश असे लिहणे, शेतकऱ्यांची सही नसणे, पॉस मशिन बंद असणे या बाबी आढळून आल्याने खत विक्रीत अनियमीतता केलेल्या लाखनी तालुक्यातील मेसर्स ईश्वरकर कृषि केंद्र, मुरमाडी, कृषि सेवा केंद्र, लाखनी, तुमसरे कृषि केंद्र, लाखनी, शेतकरी कृषि केंद्र मानेगाव सडक, रामाकृष्ण ट्रेडर्स, पिंपळगाव सडक, बजरंग कृषि केंद्र, लाखोरी, 6 खत विक्री केंद्राचे खत परवाने पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ निलंबीत केलेले आहेत असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अरूण बलसाने यांनी कळविले आहे .
या निलंबीत झालेल्या 6 खत विक्री केंद्र धारकांसह मेसर्स पदमाचल ऍ़ग्रो मार्ट ऍ़न्ड एजन्सी, गडेगाव/ लाखनी यांनी खत विक्रीत अनियमीतता केल्यामुळे तालुक्यातील कृषि केंद्रांवरील आर.सी.एफ, पी.पी.एल., आय.पी.एल., कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल फर्टीलायर्झ, व इफको इत्यादी कंपन्यांचे रासायनिक खतास रू. 25 लाख किंमतीचे 163 मे.टन खतास विक्री बंद आदेश दिलेले आहेत. या तपासणी मोहीमेत जादा दराने खत विक्री केल्याचे आढळून आलेले नाही. तथापि खत विक्री कृषि केंद्र धारकांनी खते विक्री करतांना खत नियंत्रण आदेश 1985चे व परवाना अटी व शर्थीतील नियमांचे पालन करावे, दररोज साठा व दर फलक अदयावत करावा , पॉस मशिन वरूनच खत विक्री करावे , त्याची पावती व एम फॉर्म मधील बिल शेतकऱ्यांना दयावे व त्यावर शेतकऱ्यांची सही घ्यावी, पी.डी.एम. विक्री करतांना बिलात पोटॅश न लिहीता पी.डी.एम. असे लिहावे, खत विक्रीत कोणतीही अनियमीमता करू नये, जादा दराने खत विक्री करू नये, असा प्रकार आढळल्यास खत परवाने रद्द करण्यात येईल तसेच जिल्हयात पुरेशा प्रमाणात खत पुरवठा झालेला असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय पीडीएम ( Potash Derived From Mollases ) खरेदी करतांना काळजी घ्यावी, एमओपी (Muriate Of Potash ) मध्ये 60 टक्के पोटॅश असून पी.डी.एम. मध्ये केवळ 14.5 टक्के पोटॅश आहे, त्यामुळे पोटॅशचा डोज धान पिकाला देतांना चार ते पाच पट पी.डी.एम. बॅग खरेदी कराव्या तरच पिकाला फायदा होईल. ही कारवाई जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शनात प्रदीप म्हसकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांनी केली आहे.