विविध शिष्यवृत्तीबाबत प्राचार्यांची वार्षिक सभा व कार्यशाळा संपन्न
भंडारा दि. 08 :सन 2022-23 सत्रात शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने विविध शिष्यवृत्ती योजनांचे प्रशिक्षणाबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपीक यांची वार्षिक सभा/ कार्यशाळा नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये जिल्हयातील एकूण 155 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळेमध्ये उपस्थितांना स्वाधार योजनेबाबत माहिती, समान संधी केंद्र मार्गदर्शन, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण की परिक्षा फी योजना याबाबतचे मार्गदर्शन, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार या विषयांबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.
सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी उपस्थितांना सर्व विषयाबाबत परिपूर्ण माहिती दिली. तसेच कार्यालयातील कर्मचारी विलास रामटेके, जयंत गाते, मनिषा चकोले व मंगेश बांडेबुचे यांनी उपस्थित सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील सर्व योजनांचे लाभ कशाप्रकारे घेता येतील याबाबतचे प्रशिक्षण दिले. महाडीबीटी प्रणालीबाबत महाविद्यालयस्तरावरील प्राचार्य आयडी व लिपीक आयडी कशाप्रकारे हाताळावी याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले.
कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी समाज कल्याण विभागाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी सकोल मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित लिपीकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण कशाप्रकारे करावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयस्तरावरील व विद्यार्थीस्तरावरील प्रलंबित अर्ज त्वरीत निकाली काढावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी प्राचार्यांना केले.