जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू होणार Ø विधी सहाय्यसाठी 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू होणार

Ø विधी सहाय्यसाठी 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 6 सप्टेंबर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे कार्यकारी अधिकारी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळित यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानुसार एकूण 22 राज्यांमध्ये 365 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक अर्थात डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू केले जाणार आहे. यात चंद्रपूर जिल्हाचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक, एक उपमुख्य व 3 सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक या पदांसाठी भरती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 7 सप्टेंबर 2022 आहे. या उपक्रमानुसार फौजदारी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून संपूर्ण प्रकरण निकाली होऊन अपील दाखल होईपर्यंत विधी सहाय्य पुरविले जाणार आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत महिला, 18 वर्षापर्यंतची मुले, अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती, विविध प्रकारची आपत्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप व पीडित व्यक्ती, तुरुंगात असलेल्या व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानसिक दृष्ट्या दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती व वार्षिक उत्पन्न रु. 3 लाखापर्यंत आलेल्या व्यक्तींना मोफत विधी सहाय्य दिले जाते.

तसेच प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. याचाच भाग म्हणून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, राजुरा, सिंदेवाही, मुल, पोंभूर्णा व भद्रावती येथे महिला सक्षमीकरणासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्यांना विधीसहाय्य हवे आहे, त्यांनी अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.