जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø यशवंत डॉक्टरांचा सत्कार
चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर हा कोळसा खाणींचा जिल्हा आहे. या खाणीतूनच आपण जगाला हिरे देत असतो. याची प्रचिती नुकतीच आली. शारिरीक आणि मानसिक चपळतेची कठीण परीक्षा समजल्या जाणा-या ‘आयर्नमॅन 2022’ स्पर्धेत चंद्रपूरच्या डॉक्टरांनी जर्मनीतील ड्युसबर्ग येथे विजयी पताका फडकविली. डॉक्टरांचे हे यश चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करणारे आहे, असे प्रतिपादन वने व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आय.एम.ए. सभागृहामध्ये आयोजित यशवंत डॉक्टरांच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अमोल पोद्दार, देवराव भोंगळे, सचिव डॉ. नगीना नायडु, प्रोजेक्टर डायरेक्टर डॉ. रवि अल्लुरवार, कोषाध्यक्ष डॉ. अमित देवईकर, आय.एम.ए. महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी दीक्षित यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. मुनगंटीवार म्हणाले, अर्जुनाला जसे केवळ पोपटाचा डोळा दिसत होता तसेच आपण आयुष्यामध्ये एकाग्रता ठेवून यश संपादन केले पाहिजे. जिद्द, निष्ठा, परिश्रम आणि चिकाटी यातून साकारलेले यश चिरंतन काळ टिकणारे असते. असेही ते म्हणाले.
जर्मनीतील ड्युसबर्ग येथे आयर्नमॅन 70.03 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 1.91 किलोमीटर पोहणे, 91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे असे प्रकार होते. हे तिन्ही प्रकार 8.30 तासांच्या कालावधीत पूर्ण करीत चंद्रपूरच्या इंडियन मेडीकल असोसिएशनशी संलग्नीत डॉक्टरांनी पुस्कारावर आपले नाव कोरले आहे. यामध्ये डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. सचिन भेदे, डॉ. प्राजक्ता आस्वार, डॉ. गुरूराज कुलकर्णी, डॉ. नबा शिवजी, डॉ. रिजवान अली शिवजी, डॉ. अभय राठोड व पोलिस कर्मचारी श्रीपाद बल्की यांचा समावेश असून सर्व यशवंत डॉक्टरांचा यावेळी श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.