13 सप्टेंबरपासून जिवती व कोरपना तालुक्यात कृष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम
चंद्रपूर दि. 5 सप्टें : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोरपना व जिवती तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत कृष्ठरोग व सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरीकांमध्ये कृष्ठरोग व क्षयरोग आजाराबाबत माहिती, लक्षणे व उपचार याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. कृष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे व या रोगाचा होणारा प्रसार कमी करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कृष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे दिसून येताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन किंवा गृहभेट देण्यासाठी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडून तपासणी करून उपचार करून घ्यावे, असे आवाहन कोरपना व जिवती तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी केले आहे. या शोध मोहिमेत कृष्ठरोग व क्षयरोग आजाराबद्दल माहिती, तपासणी, आरोग्य पथकाद्वारे करण्यात येणार असून या पथकामध्ये आशासेविका, पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे थुंकी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा, जिवती, पाटण तसेच ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर व कोरपना येथे तपासणीकरीता पाठविण्यात येणार आहे. तरी, नागरीकांना या शोध मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी केले आहे.