आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नौदलासह, भारतीय सेनेला दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. २:- संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. या दोन्हींसाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा आणि मनापासून शुभेच्छा !! जयहिंद!