भंडारा जिल्ह्यातील सारस पक्षी संवर्धनाकरिता तयार होणार आराखडा
भंडारा, दि. 24 : जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे धोक्यात आलेले अस्तित्व लक्षात घेऊन मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या Sou Motu Public Interest Litigation (PIL) No. 02/2021 मधील आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील सारस पक्षी संवर्धनासाठी सारस पक्षी संवर्धन आराखडा तयार करावयचा आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षेत समिती गठीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सारस पक्षाचे आधिवास सुरक्षित करून त्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सारस संवर्धन आराखडा तयार करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा सारस संवर्धन समितीच्या सदस्यांनी तुमसर तालुक्यातील सारस पक्षांचे अधिवास असलेल्या मौजा उमरवाडा, वाहिनी, बिनाकी या गावांना भेट देवून सारस पक्षी संवर्धनाबाबत स्थानिक गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच स्थानिक माहितीच्या आधारे सारस पक्ष्यांचे वास्तव्य असलेल्या अधिवास क्षेत्रांना समितीद्वारा भेट देऊन सारस पक्षाच्या अधिवास विकासाच्या दृष्टीने सविस्तर क्षेत्र पाहणी करण्यात आली.
महाराष्ट्रात सारस पक्षी फक्त भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आहेत. सारस पक्ष्यांचे आधिवास दिवसेंदिवस नष्ट होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. चालू वर्षी केलेल्या सारस पक्षी गणनेनुसार भंडारा जिल्ह्यात फक्त 3 सारस आहेत. हे पक्षी महाराष्ट्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.
सदर क्षेत्र भेटीत जिल्हा सारस संवर्धन समितीचे सदस्य भंडारा उपवनसरंक्षक राहुल गवई, जिल्हा कृषी अधिकारी अरुण बलसाने, सावन बाहेकर सेवा संस्था गोंदिया, भंडारा मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान तसेच कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शैलेश कुमार, कार्यकारी अभियंता विद्युत पारेषण विभाग किशोर भोयर, तुमसर तहसीलदार बाबासाहेब टेले, तुमसर पाटबंधारे विभाग संजय दलाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर, तुमसर खंड विकास अधिकारी श्री. नंदागवळी, वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर रहांगडाले व तुमसर येथील वन कर्मचारी व सारस मित्र उपस्थित होते. क्षेत्रभेटीतील निरीक्षणांचा समावेश सारस संवर्धन आराखड्यात करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी ही क्षेत्रभेट अत्यंत महत्त्वाची ठरणारआहे.