विचोडा गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द – मंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø शालेय विद्यार्थीनींना सायकलचे तर गावक-यांना गरम पाण्याचे बंब वितरण
चंद्रपूर दि. 22 ऑगस्ट : विचोडा ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे करण्यात आली व यापुढेही करण्यात येईल. आसपासच्या गावासोबतच विचोडा गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
विचोडा (बु.) येथे शालेय विद्यार्थिनींना सायकलचे वाटप व गावकऱ्यांना गरम पाण्याचे बंब वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी विचोडाच्या सरपंच माधुरी सागौरे, देवराव भोंगळे, विक्की लाडसे, अनिल डोंगरे, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकार आदी उपस्थित होते.
सुरवातीला संयुक्त वन व्यवस्थापन समिती विचोडा (बु.), पडोली व छोटा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांना गरम पाण्याचे बंब व गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकलचे वाटप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना श्री.मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये शिक्षणापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतीही मोठी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये व त्यांना चांगले शिक्षण घेता यावे, या दृष्टीने सायकलीचे वाटप करण्यात आले. वनविभागाने सायकल वाटपात दोन गावांची जबाबदारी घेतली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना मागील सरकारमध्ये वनमंत्री असताना सुरू केली. या योजनेअंतर्गत वनविभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले याचा आनंद होतो आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लखमापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले, लहान मुले ही ईश्वराचे रूप आहे, असे म्हटले जाते. अशा प्रसंगात लहान मुलांना गणवेश दिले हे ईश्वरीय कार्य आहे. विचोडा गावातील नागरिकांवर विशेष प्रेम असून येथील जनतेने नेहमी सहकार्य केले आहे. या गावातील हनुमान मंदिराचे काम त्यासोबतच विविध विकास कामे गावांमध्ये करण्यात आली आहे. आजूबाजूच्या गावासोबतच या गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छोटा नागपूर येथील समिक्षा आंबीलकर, धम्मश्री साखरकर, सुहानी बोढे, जानवी अलोने व शर्वरी दुपारे, जुनी पडोली येथील श्रावणी झाडे, किरण नागरकर, वर्षा राय, समिक्षा दिवसे व रिया कोरडे, तसेच रामविलास मित्तल व ओमप्रकाश अग्रवाल यांच्या माध्यमातून लावण्या जाधव, नव्या जाधव, उर्वशी ठाकरे, स्वाती महल्ले व साक्षी लोणबले या शालेय विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले. तर विचोडा(बु.) येथील पुष्पा महाले, अनिल बारसागडे आदींना गरम पाण्याचे बंब वितरित करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लखमापूर येथील रघुवीर खुसरो, गजेंद्र जयस्वाल, विवेक साहू व विहान गायकवाड या शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला नरेश भोवरे, संयुक्त वन्य व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्वश्री किरण डोंगरे, विशाल वाढई, किरण अलोणे तर कोषाध्यक्ष सर्वश्री प्रमोद जाधव, विजय माशीरकर, बेबीनंदा सागौरे प्रामुख्याने उपस्थित होते.