अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्या 75 नागरिकांचा सत्कार
पूरस्थिती यशस्वीपणे हाताळणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन टीम व मनपा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चंद्रपूर १७ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्या 75 नागरिकांचा आज सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील पूरपरिस्थिती यशस्वीपणे हाताळणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा, स्वयंसेवी संस्थांचा व मनपा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार आयुक्त राजेश मोहिते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींग करून मोहिमेस सहकार्य करणाऱ्या 75 जलमित्रांना प्रमाणपत्राचे वाटप मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यास मनपातर्फे जनजागृती करण्यात येते. त्याला प्रतिसाद देऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यास सुरवात केली आहे त्यास प्रोत्साहन म्हणुन मनपातर्फे आज प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
२००६ नंतर शहरात पहिल्यांदाच आलेल्या पूरपरिस्थितीचा महानगरपालिकेने यशस्वीरीत्या सामना केला असुन नागरिकांना पूरपरिस्थितीबाबत विविध माध्यमातुन अवगत करून जनजागृती करणे, पुराच्या पाण्यातुन नागरिकांना रेस्क्यु करणे, मनपाच्या शाळांमध्ये त्यांना स्थलांतरीत करणे, त्यांची चहा, नाश्ता, जेवण तसेच झोपण्याची व्यवस्था करणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे व प्रसंगी रुग्णालयात दाखल करणे, पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर त्या जागी निर्जंतुकीकरण करणे इत्यादी कार्ये मनपा आपत्ती व्यवस्थापन चमुकडून पार पाडण्यात आली. योग्य नियोजन राखुन कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन चमुचे अग्निशमन विभाग,मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,आरोग्य विभाग, स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत या प्रसंगी मोलाची मदत केली होती, अश्या महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र, रामु (रितेश) तिवारी मित्र मंडळ, सिंधी पंचायत समिती या स्वयंसेवी संस्थांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला
मनपा शाळेची १० वीची प्रथम बॅच असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला. सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेतील २१ व श्यामाप्रसाद मुखर्जी शाळेतील १६ अश्या एकुण ३७ विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.