वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांचेहस्ते ध्वजारोहण
गडचिरोली,(जिमाका)दि.15
जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत अमुलाग्र बदल झाले आहेत. जिल्हयात दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधा अजून चांगल्या प्रकारे कशा देता येतील याबाबत प्रशासन काम करीत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी ध्वजारोहण कार्यक्रमावेळी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी ध्वजरोहण केले. यावेळी त्यांनी जिल्हयातील आदरणीय ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, या वर्षीचा स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. त्यांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढत व त्यांच्या विचारांना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांनी अखंड भारतासाठी आपणही योगदान देण्यासाठी आज संकल्प करूया असे आवाहनही केले. या ध्वजारोहण प्रसंगावेळी आमदार डॉ. देवराव होळी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुमार आशिर्वाद, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सांगितले आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याने बरीच प्रगती केली असून मोबाईल आणि इंटरनेट मधेही आता गतीने कामे केली जात आहेत. नुकतेच जिल्हयात खाजगी कंपन्यांकडून ५०० हून अधिक नवीन मोबाईल टावर उभारण्यात येणार आहेत. यापुर्वी सर्व तालुक्यात शासकीय कार्यालये इंटरनेटने जोडली गेली आहेत. जिल्हयात रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होत आहे. मेडिकल कॉलेजही सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळाली असून गोंडवाना विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक युवकाला जिल्हयातच शिक्षण व उद्दोगाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन गतीने योजना राबवित आहे.
पोलिस विभागाबद्दल माहिती सांगतांना म्हणाले की, जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 302 नक्षली ठार झाले तर 377 जणांना अटक करण्यात आली. 2893 नक्षल समर्थकांना अटक झाली. ही कामगिरी करीत असताना 212 जवान शहीद झाले आहेत, शहिद जवानांना त्यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी केले.
विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव
यात सेवानिवृत्त परिसेविका, सामन्य रुग्णालय, गडचिरोली येथील श्रीमती शालीनी नाजुकराव कुमरे, शिक्षक जि.प. उच्च प्राथमिक शाळा, असरअल्ली, ता. सिरोंचा येथील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखामेंढा, ता.धानोरा देवाजी तोफा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गुरुदेव सेवा मंडळ, गडचिरोली नानाजी वाढई, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, गडचिरोली कृष्णा रेड्डी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, गडचिरोली प्रकाश बापूसाहेब गायकवाड, आरेखक पाटबंधारे विभाग गडचिरोली गोपीचंद निलकंठ गव्हारे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली ङि जी. कोहळे, सन 2021-22 या आर्थिक वर्षात शेतकरी मासिकाचे 552 वर्गणीदार केल्याबद्दल सुरभी राजेंद्र बावीस्कर, तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, गडचिरोली अंतर्गत महाआवास अभियान 2.0 पुरस्कार सन 2021-22 करीता प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत मन्नेराजाराम पं.सं. भामरागड, इतर राज्य योजना पुरस्कार, जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत, इरकडूम्मे पं.स. भामरागड, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण), जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ तालुका, भामरागड, इतर राज्य योजना पुरस्कार, जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ तालुका, आरमोरी, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण), जिल्हास्तरावरील सर्वोत्कष्ठ क्लस्टर, वैरागड- मानापूर आर.एच.ई, राकेश चलाख, इतर राज्य योजना पुरस्कार जिल्हास्तरावरील सर्वोत्कष्ठ कल्स्टर, बेडगाव-कोटगुल, आर.एच.ई, प्रमोद मेश्राम यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय जवळ 75 फूट ध्वजाची उभारणी
गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच 75 फूट उंच ध्वजाची उभारणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवन समोर करण्यात आली आहे. या ठिकाणचा ध्वज मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी संजय मीणा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वरती घेण्यात आला. उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अभियंत्यांनी तातडीने काम पूर्ण करून ध्वजाची उभारणी केली.