स्वराज्य महोत्सवांतर्गत लाखणीत व्याख्यानमालेचे आयोजन
लाखनी, दि. 13 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सवांतर्गत लाखनी येथे व्याख्यानमालेचे आयोजन तालुका प्रशासनाने केले होते.वेगवेगळ्या विषयांवरील व खासकरून महिलांच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध व्याख्यानांची मेजवानी यावेळी लाखनीवासीयांना अनुभवता आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती लाखणीच्या सभापती प्रणाली सार्वे तर उद्घाटक म्हणून नगरपंचायत लाखणीच्या अध्यक्षा पोहरकर तसेच तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, व्याखाते नरेसग नवखरे, डॉ. अर्चना तलमले, मिलिंद इंगळे, किशोर पात्रीकर, डॉ.उमेद समनवयक सविता तिडके, अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
स्वातंत्र्यसंग्रामात स्त्रियांचे योगदान
लाखनी तालुक्यात कोरोना कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या व शिक्षण विभाग, पं.स.लाखनी येथें कार्यरत असणाऱ्या नरेश नवखरे यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा मागोवा घेतला.तसेच , भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढे , चळवळी याबाबत माहिती दिली व महिलांच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले.
महिलांच्या आरोग्याचा जागर
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुरमाडी (तूप) येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. अर्चना तलमले यांनी महिलांचे दैनंदिन आरोग्य, दिनचर्या, मासिक पाळी नियोजन, कर्करोग व इतर बाबींची माहिती दिली. तसेच, दररोज च्या आहारातून आरोग्य कसे जपावे, याबाबत समर्पक शब्दात मार्गदर्शन केले.शिवाय, मोबाईल च्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली
अर्थसाक्षरता व सेंद्रिय शेती
जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे मिलिंद इंगळे यांनी अर्थसाक्षरता, विविध अनुदान योजना, बँकमार्फत दिली जाणारी कर्जसुविधा व शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच, बँकेकडून अर्थसहाय मंजूर झालेल्या दोन बचतगटांना धनादेशाचे वितरण याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी गुंफले.पात्रीकर यांनी सेंद्रिय शेतीचा आवश्यकता, पिकातील पोषणमूल्य, पीकपद्धती, फायदेशीर शेती याबाबत अतिशय ओघवत्या शब्दात मार्गदर्शन केले व सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कृषी सहायक नवखरे यांनी कीटकनाशके व पिकउत्पादनातील वाढ याबाबत माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण राष्ट्रगीताने
भारताचे मूळ राष्ट्रगीत हे पाच कडव्याचे आहे. सामान्यतः सार्वजनिक कार्यक्रमात पहिले कडवे गायले जाते.या व्याख्यानमालेच्या शेवटी राष्ट्रगीतातील पूर्ण पाचही कडव्यांचे गायन केले गेले. यामुळे सर्व वातावरण भारावून गेले. स्वराज्य महोत्सवांतर्गत लाखनी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून सर्व कार्यक्रमांना जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, वर्षा दहीकर यांनी केले तर आभार उमेश उइके यांनी मानले.