अति मोबाइल वापर धोकादायक मनपातर्फे घेण्यात आले दुष्परिणाम मार्गदर्शन शिबीर
चंद्रपूर ११ ऑगस्ट – आधुनिक काळात मोबाईल, कॉम्युटर, लॅपटॉप यांचा वापर आयुष्याचा एक भाग झाला आहे. लहानग्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलच्या अधीन झालेले दिसतात. मग कधी गाणी ऐकण्यासाठी तर कधी गेम खेळण्यासाठी तर कित्येकांच्या प्रोफेशनची गरज म्हणूनही तासन तास फोनवर बोलावं लागतं. यातुन काय दुष्परिणाम होतात यावर चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे व डॉ. अश्विनी भारत यांनी विविध शिबीराद्वारे नागरीकांना मोबाईलचे दुष्परीणाम या विषयावर मार्गदर्शन केले. सध्या मोबाईल हा जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या देशात करोडो लोक मोबाईल वापरतात. मोबाईल हातात घेतल्यशिवाय अनेक जणांची सकाळही होत नाही. वापराची सवय लागल्याने मोबाईलशिवाय चैन पडत नाही असे आपल्या आजुबाजूला कितीतरी जण असतील. मात्र मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने मोबाईल घटक ठरू शकतो.
मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा मानवी जीवनावर घटक परिणाम होऊ शकतात. रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित होते. पेशीची कार्यक्षमता खालावते. वर्षानुवर्ष मोबाइल वापरामुळे जे धोके झाले आहेत, त्यात कानाजवळ मुंग्या आल्याची भावना होणे. हे एक सामान्य लक्षण आहे. त्याशिवाय थकवा, गळावट, झोपेतील अनियमितता, लक्ष न लागणे, एकाग्रतेचा अभाव, पटकन प्रतिक्रया न निर्माण होणे, डोकदुखी, बैचनी, अशक्तपणा, हृदयात धडधडणे, रक्तदाब वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात.
तेव्हा मोबाईलचा वापर मर्यादित करायला हवा. आवश्यकता नसेल तर उगीच मोबाईल चालत बसण्यापेक्षा वाचनाकडे वा इतर गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे अधिक चांगले आहे. या मार्गदर्शन शिबिरास सर्व आरोग्य कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.