अन्न सुरक्षा सप्ताहांअंतर्गत जिल्ह्यात जन जागृती मोहीम
भंडारा दि. 8 : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या अनुषंगे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत अन्न व औषध प्रशासन, भंडारा या कार्यालयातर्फे सुरक्षित आहार, आरोग्याचा आधार हे ध्येय घेऊन दिनांक 5 ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2022 पर्यंत अन्न व औषध प्रशासनातर्फे यांच्यामार्फत “अन्न सुरक्षा सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक घरात दररोजच्या स्वयंपाकात साखर, मीठ व खाद्यतेल यांचा वापर होतो, यांच घटकांचा योग्य वापर करण्याबाबत पोस्टर्स, भित्तिपत्रके व कार्यशाळेच्या माध्यमातून गृहिणींचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच सप्ताहांतर्गत अन्न सुरक्षेचे नियम जीवनातील गरज, घ्यावयाची काळजी, आवश्यक उपाययोजना, विद्यार्थांना पुरवावायचा पोषक आहार प्रशिक्षण तसेच मार्गांदर्शनासाठी प्रभातफेरी, रॅली, कार्यशाळांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी लाल बहादुर शास्त्री हाय स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भंडारा येथे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती करिता शपथ देण्यात आली तसेच जंक फूडचा दुष्परिणामांबद्दल प्रबोधन करण्यात आले. तसेच साखर, मीठ व खाद्यतेलाचा दररोजच्या जेवणात वापर कमी करण्याचे आव्हान करण्यात आले.
तसेच विनापरवाना व्यवसायाईकांचे विनाविलंब अन्न परवाने व नोंदणी देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून त्यांतर्गत 2 शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच स्वस्त धान्य दुकानाच्या परवाने व नोंदणी देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. अन्न व्यवसायिकांना कायद्याच्या विविध तरतुदींबाबत तसेच परवाने व नोंदणी करिता ऑनलाइन अर्ज करतेवेळी येणाऱ्या अधचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्राहकांनी त्यांचे अधिकार व अन्न पदार्थखरेदी करतांना घ्यावयाची काळजी या बाबत सुद्धा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक (अन्न), अ. प्र. देशपांडे यांनी केले आहे.