स्वराज्य महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांनी सहभागी व्हावे
भंडारा दि. 8 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.सध्या हर घर तिरंगा सोबत स्वराज्य महोत्सवाला उदया दि.9 ऑगस्टपासून सुरवात होत आहे.
9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव होणार आहे. याचाच एक भाग म्हणून उदया दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे वीरमाता,वीरनारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.तर माजी सैनिक सर्वश्री विष्णु वैदय,अनिल भोंगाडे,मिलींद धारगावे,रामचंद्र कारेमोर हे युध्दामध्ये सहभागी झाल्याबाबतचे त्यांचे अनुभव सांगणार आहेत. त्यांनतर माजी सैनिक मोटर सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते लाखनी ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारापर्यत येणार आहे.
तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाच्या वतीने ११:३० वाजता भंडारा शहरातील नागपूर रोडवरील मंगलम सभागृह येथे आदिवासी दिन तथा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, रवींद्र राठोड, भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे यांच्यासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडाराचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा कार्यालयाच्या वतीने आश्रम शाळेतील विद्यार्थींसाठी नृत्य स्पर्धा होणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील आश्रम शाळेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव तसेच पालकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भंडाराचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे.