महाराष्ट्राच्या राजकारणात ‘एम-एम’ फॅक्टर महत्वाचा-डॉ.अशोक सिद्धार्थ
परभणीत मातंग समाजाची राजकीय भागीदारी परिषद संपन्न
मुंबई / परभणी
पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेपासून कायमच दूर असलेल्या मातंग समाजाने आंबेडकरी आंदोलनात सामील झाले पाहिजे. या क्रांतीकारी आंदोलनात केवळ बहुजन समाज पार्टीच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे येत्या काळात मातंग समाज हा सत्तेचा केंद्रबिंदू झाला पाहिजे, या ध्येयाने झपाटून कार्यसिद्धीला प्राप्त करू, असा विश्वास बसपाचे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ.अशोक सिद्धार्थ यांनी व्यक्त केला.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज, रविवारी मराठवाडा विभागीय बुद्धीजीवी मातंग समाजाची राजकीय भागीदारी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेते उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.सिद्धार्थ यांनी मातंग समाजाबद्दल बसपाची भूमिका स्पष्ट केली. शहरातील श्री.रघुनाथ सभागृहात आयोजित या परिषदेते डॉ.सिद्धार्थ यांच्यासह प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब, प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.सिद्धार्थ म्हणाले की, मातंग समाज चळवळीतील एकमेव अशा बसपाच्या विचारपीठावर आला तर महाराष्ट्राच्या राजकारणात तो केंद्रबिंदू ठरणारच, यात दुमत नाही. महार आणि मातंग (एम-एम) या जातीय फॅक्टर ला एकत्रित करून आणि उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे मान्यवर कांशीराम यांनी सर्वसमाजाला एकाच विचारपीठावर आणून सत्तेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जातींना जोडण्यात पक्ष यशसिद्धी प्राप्त करून राज्यात बहुजनांची सत्ता आणेल, असा विश्वास डॉ.सिद्धार्थ यांनी व्यक्त केला.
पीडित, शोषित, उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच बसपाचा जन्म झाला आहे.मान्यवर कांशीराम साहेबांनी फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांवर स्थापन केलेल्या या राजकीय विचारपीठावर माननीय सुश्री.बहन.मायावती जी यांच्या नेतृत्वात सामाजिक विकासाकरीता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांनी प्रेरित होवून मातंग समाजाने एकत्रित व्हावे, असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केले. सर्वसमाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ बसपाच करते.मातंग समाजाला राजकारणात योग्य भागीदारी देण्याचे काम पार्टी प्राधान्याने करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी परिषदेतून दिला.
कार्यक्रमात मा.मनीष दादा कावळे, प्रदेश महासचिव मा.दिगंबरराव ढोले, प्रदेश सचिव मा.गौतम उजगरे,मा.गंगाधर जी पौळ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.भिमराव जोंधळे,झोन प्रभारी देवराव दादा खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष मा.बायजा बाई घोडे, जिल्हा अध्यक्ष मा.अनिरुद्ध रणवीर, जिल्हा कार्यालयीन सचिव मा.समाधान पोटभरे, कोषाध्यक्ष राहुल घनसावंत, सचिव धारबा गायकवाड, शहर उपाध्यक्ष तसेच विधानसभा अध्यक्ष सर्जेराव पालवे,मा.शुभम धाडवे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
‘सर्वजन हिताय’साठी प्रयत्नरत-मा.प्रमोद रैना
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हत्ती निवडणूक चिन्ह असलेल्या बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मातंग समाजाने ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ हा विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी झटणाऱ्या पार्टीचे हात बळकट करावे,असे आवाहन प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना यांनी केले. आगामी काळात नवबौद्धांसह मातंग समाजाला देखील पक्षात भागीदारी देवू, असा विश्वास यावेळी रैना यांनी उपस्थितांना दिला.
समाजाला योग्य भागीदारी देवू-मा.नितीन सिंह
पुरोगामी महाराष्ट्रात पीडितांना आणखी दाबण्याचे काम व्यवस्थेकडून केले जात आहे. पंरतु, या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम बसपाचे आहे. शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी पार्टी अहोरात्र प्रयत्नरत आहे. साहित्यरत्नांनी लिहून ठेवलेल्या ‘जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव।’ या ओळींप्रमाणे या बदलत्या काळात मातंग समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ बसपाच करीत आहे,असे प्रतिपादन प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेबांनी उपस्थितांना संबोधित करतांना केले.