चंद्रपूर मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविली ” तिरंगा राखी “
हर घर तिरंगा अभियानांतर्गत नावीन्यपुर्ण उपक्रम
केजी १ ते इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग कार्यशाळेत शिक्षकांचे मार्गदर्शन
चंद्रपूर ६ ऑगस्ट – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ” हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा ” अभियानांतर्गत मनपा सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांनी
तिरंगा राख्या बनविल्या आहेत. या नावीन्यपुर्ण उपक्रमाची अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी करून विद्यार्थांचे अभिनंदन केले.
देश स्वतंत्र होण्यास 75 वर्ष पुर्ण होत आहेत या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचावीणे अपेक्षित आहे. या अभियानात सर्व नागरीकांना सहभागी होता यावे यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तिरंगा राखी हा उपक्रम मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला.
उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले शाळेत कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणाधिकारी नागेश नीत यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षकांनी आपल्या घरांमध्ये वापरात असलेल्या किंवा नसलेल्या विविध मण्यांच्या रंगीत माळा,लोकर, विविध धागे,विविध प्रकारचे कागद, स्ट्रॉ, कापूस, पेन्सील इत्यादीचा वापर करून उत्तम तिरंगा राखी कशी बनवता येईल याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. त्यानुसार केजी १ ते इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आकर्षक राखी बनविल्या. कार्यशाळेस श्री.वलके,श्री.गेडाम,श्री.रामटेके,श्री.अंबादे,श्री. शेंद्रे,श्री.मोहारे,सौ. कुराणकर यांचे सहकार्य लाभले.