‘ घरो घरी तिरंगा ’ अभियानांतर्गत सायकल रॅलीद्वारे जनजागृती
मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
चंद्रपूर, दि. ६ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरो घरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आज (दि.६ ऑगस्ट) रोजी चंद्रपूर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.
मनपाच्या सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा येथुन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत उपस्थित होते. सदर रॅली सावित्रीबाई फुले शाळा नेताजी चौक येथुन बाबुपेठ ते महादेव मंदीर मार्गे गाडगेबाबा चौक ते मराठा चौक मार्गे गुरूदेव चौक या मार्गाने गेल्यानंतर सावित्रीबाई फुले शाळा येथे समारोप करण्यात आला. रॅलीत शाळेच्या १०० विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता. रॅलीदरम्यान परिसरातील सर्व नागरीकांनी राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी व जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी विविध घोषणांद्वारे आपल्या घरी ध्वज उंचावण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता सावित्रीबाई फुले शाळेतील वलके सर ,गेडाम सर ,रामटेके सर ,अंबादे सर, शेंद्रे सर,मोहारे,कुराणकर मॅडम यांनी सहकार्य केले.