मनपातर्फे कल्पक व्हिडिओ स्पर्धा ” माझा तिरंगा माझा अभिमान ” विषयावर बनवा नाविन्यपुर्ण व्हिडिओज
चंद्रपूर ३ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” कल्पक विडिओ स्पर्धा राबविली जाणार असुन यात ” माझा तिरंगा माझा अभिमान ” या विषयांतर्गत नाविन्यपुर्ण व्हिडिओज बनविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रथम रु. ५ हजार ,द्वितीय रु. ३ हजार तृतीय रु. २ हजार तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व सांगणारे, देशभक्तीची भावना जागृत करणारे व्हिडिओज बनवुन सोशल मिडियावर नागरीकांनी अपलोड करायचे आहेत व अपलोड केल्याची लिंक मनपाकडे द्यावी. याकरीता दिला जाणारा बारकोड स्कॅन करावा व ओपन झालेल्या गुगलशीटवर माहिती भरावी व आपल्या व्हिडीओची लिंक अपलोड करून गुगलशीट सबमिट करावी. गुगलशीटची लिंक सुद्धा सोबत दिलेली आहे. आपले विडिओ पोस्ट करतांना #CMC #harghartiranga #घरोघरी तिरंगा #creativevideocompetition या सर्व हॅशटॅगचा वापर करणे अनिवार्य आहे तसेच @CMCchandrapur या मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आपली व्हिडिओ पोस्ट टॅग करावी.स्पर्धेसाठी देण्यात येणाऱ्या व्हिडिओची लांबी ही ५ मिनिटांच्या वर नसावी.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासन निर्देशानुसार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी आपला देश स्वतंत्र होण्यास 75 वर्ष पुर्ण होणार आहेत म्हणुन हा 75 वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी.