महसूल दिननिमित्त उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार
भंडारा दि. 3 : नुकताच 1 ऑगस्ट महसूल दिन जिल्हा नियोजन भवन येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व तसेच महसूल विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेहस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले. साहेबराव राठोड, अधिक्षक यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. महसूल दिनानिमीत्त निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रास्तावीक भाषण केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
1 ऑगस्ट महसूल दिन असून, महसुल विभाग शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत आहे. जमीन महसूल वसुली आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या उद्देशाने सुरू झालेल्या या विभागात सध्या गौणखनिज स्वामित्वधन व अनधिकृत कारवाई, विविध खात्याची थकित वसुली, सर्व प्रकारच्या निवडणूका, जनगणना, आर्थिक गणना, कृषि गणना, आधार कार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी योजना, जात,रहिवाशी, मिळकत ऐपत, राष्ट्रीयत्व, जेष्ठ नागरीक, शेतकरी दाखला, भूमीहीन/अल्प भूधारक व इतर प्रमाणपत्रे, पाणी/ चारा टंचाई, सर्व प्रकार च्या नैसर्गिक आपत्ती, मोचा, उपोषण, रस्ता रोको, यासह शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जातात त्याची जवाबदारी महसूल विभागावर आहे. कोणतेही कायदेशीर बंधन नसताना या विभागाचे अधिकारी/कर्मचारी दररोज दोन तीन तास जास्त काम करतात. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणा-या या यंत्रणेतील कार्यरत अधिका-यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली.
जिल्हयातील उत्कृष्ट कामे करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, उपविभागीय अधिकारी, साकोली श्रीमती मनिषा दांडगे, तहसिलदार लाखनी महेश शितोळे, नायब तहसिलदार बी.एस. पेंदाम, तहसिल कार्यालय, तुमसर, अव्वल कारकून किशोर राऊत, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा, मंडळ अधिकारी एस.के.कारेमोरे, मंडळ अधिकारी, जि.का.भंडारा, महसुल सहाय्यक रमेश उके, तहसिल कार्यालय, लाखांदुर, तलाठी मोरेश्वर मरस्कोल्हे, तहसिल कार्यालय, लाखनी, शिपाई व्ही. आर. काळे, तहसिल कार्यालय, तुमसर, कोतवाल एस.के. खंडाईत, तहसिल कार्यालय, लाखनी अशा सर्व संवर्गातील उत्कृष्ट कामे करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आलेला आहे. महसुल दिनानिमीत्त बी. एस. पेंदाम, नायब तहसिलदार, एस.के.कारेमोरे, मंडळ अधिकारी, किशोर राऊत, अव्वल कारकुन, कु.माधुरी मस्के, अव्वल कारकुन यांनी महसुल दिनानिमीत्त आपले मनोगत व्यक्त केले. मा.जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षीय भाषण केले. निमीश गेडाम, महसुल सहाय्यक यांनी आभार प्रदर्शन केले.