स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’चे आयोजन : 9 ते 17 ऑगस्ट | लोकसहभागातून कार्यक्रमाचे योग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’चे आयोजन : 9 ते 17 ऑगस्ट

लोकसहभागातून कार्यक्रमाचे योग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

भंडारा, दि. 27 : शासनाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्यांचे संस्मरण व्हावे या उद्देशाने स्वातत्र्यांचा अमृत महोत्सवांतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने विविध उपक्रम, कार्यक्रम राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर आयोजित करण्याचे निर्देश असून त्याबाबत सर्व विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करीता कार्यक्रमाचे योग्य व प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिल्या आहेत.

स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे यशस्वीरित्या जास्तीत जास्त लोकसहभागातून आयोजन करावयाचे असून 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या विभागार्तंर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम सादर करावे. हुतात्मा स्मारके सुशोभीकरण, जिल्ह्यांतर्गत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभांचे आयोजन करण्यात यावे. स्वातंत्र्यदिनी जिल्हास्तरावरुन मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगी रंगाचे बलून आकाशात सोडणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील अनाम वीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्याच्या कार्याची माहिती गावातील रस्त्याच्या कडेला लावण्यात यावी. स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. या प्रभात फेरीत सर्वांना सहभागी करुन घेणे, जिल्ह्याच्या मुख्यालयी 75 फुट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. शालेय, महाविद्यालय स्तरावरुन विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. स्वातंत्र्यदिनी एनसीसी, एनएसएस कॅडेटचे संचलन करण्यात यावे. तसेच सायक्लोथॉन, मॅरेथॉनचे जिल्ह्याच्या मुख्यालयी आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात यावी. जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात यावे.

13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांनी आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. जसे कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा जाणिव जागृती आदी. जिल्ह्यातील अनाम वीर, हुतात्मा, शहिद यांची माहिती सह सचित्र अनसंग हिरो बुकलेट तयार करण्यात यावी. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर आजादी का अमृत महोत्सवी लोगो लावावा.

जिल्ह्यातील पुरातत्व दृष्टया महत्वाच्या वारसा स्थळांची स्वच्छता करण्यात यावी. या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त कार्यालयाची स्वच्छता करण्यात यावी. जिल्ह्यातील पुरातत्वदृष्टया महत्वाच्या वारसा स्थळे देखभाल करण्यासाठी ऐतिहासिक वारसा जपवणूक करणाऱ्या संस्थांना दत्तक देण्यात यावे. जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी करण्यात यावी व मुख्यालयी शासनमान्य लामणदिवा लावणे अपेक्षित आहे, अशा सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या उपक्रम व कार्यक्रमाचे योग्यरित्या नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. याबाबत शासनाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून त्याचे अवलोकन करुन त्यानुसार नियोजन करावे.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.