कारगिल विजय दिवसानिमित्त वीरमातांचा सत्कार
भंडारा, दि. 26 : कारगिल विजय दिवसानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वीरमाता व वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड व सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तसेच वीरपत्नी श्रीमती उर्मिला तितिरमारे, श्रीमती ज्योती सिंद्राम, श्रीमती किरण भोंडे यांचे पुष्पगुच्छ व साडीचोळी देऊन श्री. महेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जुलै 1999 मध्ये कारगील येथे झालेल्या लढाईबाबत सविस्तर माहिती दिली. सैनिक देशातील जनतेच्या प्राणांचे रक्षण करतात. वीरपत्नी व वीरमाता यांच्या कुटुंबियांचे प्रश्न व अडी अडचणी सोडविण्यासाठी तत्पर प्रतिसाद दिला पाहीजे. देशातील सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीरांच्या नातेवाईकांचे प्रश्न सोडविणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक सुधाकर लुटे यांनी केले तर सुरेश घनमारे, श्री. अंभोरे, श्री. हटवार यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.