मनपातर्फे करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण
चंद्रपूर २२ जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोज लसीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांच्या हस्ते फीत कापुन मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना बुस्टर डोज देण्यात आला. यात कोव्हीशिल्डचे २२९ तर कोवॅक्सिनचे २५ डोज असे एकुण २५४ लसीकरण करण्यात आले. मनपा आरोग्य विभागातर्फे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार,श्यामल रामटेके, सरिता लोखंडे व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सदर लसीकरण मोहीम राबविली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलै पासुन १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुढील ७५ दिवस चालणारी ही लसीकरण मोहिम निःशुल्क असुन कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन ६ महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.