मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजना
गडचिरोली, दि.22: दिनांक 1 एप्रिल 2022 पासुन सुरु झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दिनांक 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. तरी थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकीत शास्ती या संबधी पक्षकारांना दिनांक 31 मार्च 2022 पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधित पक्षकारांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता तात्काळ जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डीकर यांनी केले आहे.
संबंधित पक्षकारांनी दि. 31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिला टप्प्याचा म्हणजे थकीत शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल.
योजनेचे संक्षिप्त स्वरुप पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 31, 32 (अ), 33, 33 (अ), 46, 53 (अ) अन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात दिनांक 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापुर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांकरीता सदर माफी योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. सदर योजना ही, दि.01 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत (8 महिने) कार्यान्वीत राहणार आहे. सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. 01 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास, दंडाच्या रक्कमेत 90 टक्के सुट मिळेल. 01 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत 50 टक्के सुट मिळेल.
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर वर 8888007777 व ईमेल आयडी complaint (at)igrmaharashtra(dot)gov(dot)in यावर संपर्क साधावा असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.