जिल्हाधिका-यांनी घेतला ‘हर घर झेंडा’ अभियानाचा आढावा
चंद्रपूर,दि. 15 जुलै : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्यावतीने प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचना व त्यासंदर्भात विविध यंत्रणांनी केलेली कार्यवाही, याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार आणि न.प.मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फुर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करावयाची आहे. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. आपापल्या स्तरावर कुटुंबांची संख्या, लागणारे झेंडे आदींचे नियोजन तसेच शासकीय परिपत्रकानुसार कृती आराखडा तयार करावा. ध्वजसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. ध्वज संहितेचे पालन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर्व शासकीय कर्मचा-यांनी सदर कालावधीत आपापल्या घरावर ध्वज उभारणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, युवक मंडळ, शाळा – महाविद्यालये आदींची बैठक घेऊन या उपक्रमात त्यांना सहभागी करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
सोबतच 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, तिरंगा बलुन हवेत सोडणे, प्रभातफेरी काढणे, अमृत सरोवर फ्लॅगपोस्ट तयार करणे, वारसा स्थळांची स्वच्छता, कार्यालयांची स्वच्छता करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.